मोठी बातमी : पुण्यातील MPSC आंदोलनावरून हायकोर्टात खडाजंगी, मुख्य न्यायाधीश याचिकाकर्त्यावर संतापले, "विद्यार्थी समाजकंटक नाहीत.." - टॉप न्यूज मराठी

मुंबई : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाने आता वेगळे वळण घेतले आहे. या आंदोलनावर बंदी घालावी यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज मुख्य न्यायाधीश महेश चंद्र त्रिपाठी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

काय म्हणाले मुख्य न्यायाधीश

सुनावणी दरम्यान मुख्य न्यायाधीश महेश चंद्र त्रिपाठी म्हणाले, " विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची हौस नाहीये. ते पुण्यात अतिशय संघर्ष करून शिकत असतात. ते समाजकंटक नाहीत. जर परीक्षेत काही घोळ झाला असेल तर त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्या."

तसेच कोर्टाने विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील केली आहे. आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चर्चा करून मार्ग काढण्याचा सल्ला कोर्टाने दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केले आहे. परीक्षेतील काही अनियमितता आणि निकालातील घोळ यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. या आंदोलनामुळे पुण्यातील वाहतुकीवर परिणाम होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. मात्र मुख्य न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांची बाजू समजून घेत याचिकाकर्त्यांनाच फटकारले.

ही बातमी अजूनही अपडेट होत आहे....