मुंबई : आयपीएसअधिकारी विश्वास नांगरे पाटलांना IPS Vishvas Nangare Patil मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी कठोर शब्दात खडसावल आहे. नुकतेच नागपूर पोलीस आयुक्त म्हणून बदली झालेले विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन संघाची स्तुती केली होती. याप्रकरणी राज ठाकरेंनी नांगरे पाटलांना तुमचा सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका असा खोचक सल्ला दिला आहे.
आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. दरम्यान नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांमध्ये विश्वास नांगरे पाटील यांनी हजेरी लावली होती. दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केली. यावर राज ठाकरे यांनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना कठोर शब्दात फटकारताना म्हटले आहे की, " नांगरे पाटील असो किंवा अजून कोणी यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर हेच हवे आहे. परंतु नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात. तुम्ही तुमचा सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे. परंतु ते एक पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलन भरवली जात आहेत. आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुती सुमने उधळली. मुळात ही संमेलन भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असलं तरी ती राजकीय आहेत. आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत याचा थोडा शोध घेतला आणि विचार केला जरी तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणून घेणाऱ्या प्रत्येकाने कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे. परंतु त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलीस अधिकाऱ्याने तेथे जावं का ? असा प्रश्न आहे...!" असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
यावेळी राज ठाकरे यांनी 2012 साली घडलेल्या एका घटनेबाबत देखील सरकारला आठवण करून दिली आहे. ते म्हणाले की, " 2012 ला रजा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्चात एका कॉन्स्टेबलने येऊन पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तात्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा दाखवायलाच हवी असं वाटतं. आमदार खासदार यांना आमच्याकडे या म्हणलं की पळत जावं लागतं. अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. तरी नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात. तुम्ही तरी तुमचा सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका...! " असा खोचक सल्ला राज ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.
यावर अद्याप आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील किंवा सरकारकडून कोणतेही भाष्य केले गेलेले नाही.