व्यक्तिविशेष : नागपूरच्या एका सामान्य कार्यकर्त्यापासून भारताच्या Expressway Man पर्यंत; नितीन गडकरींचा प्रेरणादायी प्रवास ! - टॉप न्यूज मराठी

व्यक्तिविशेष : भारतीय राजकारणात असे काही नेते आहेत जे पक्षाच्या पलीकडे जाऊन कामामुळे ओळखले जातात. नितीन गडकरी हे त्यापैकी एक नाव आहे. त्यांना विरोधक सुद्धा विकास पुरुष म्हणून मानतात.

जन्म आणि कौटुंबिक पार्श्वभूमी

नितीन जयराम गडकरी यांचा जन्म 27 मे 1957 रोजी नागपूर येथे एका मध्यमवर्गीय मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयराम गडकरी होते जे शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते होते, तर आईचे नाव भानुताई गडकरी. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने लहानपणापासूनच त्यांच्यावर संघाच्या विचारांचा प्रभाव होता. घरची परिस्थिती साधारण असल्याने शेतीतील कष्ट आणि ग्रामीण जीवनातील प्रश्न त्यांनी जवळून पाहिले आहेत. त्यांचा विवाह 1984 मध्ये कांचन गडकरी यांच्याशी झाला. त्यांना दोन मुले निखिल, सारंग आणि एक मुलगी केतकी अशी तीन अपत्ये आहेत.

शिक्षण

गडकरी यांचे संपूर्ण शिक्षण नागपूरमध्येच झाले. त्यांनी जी. एस. कॉमर्स कॉलेज नागपूर येथून बी.कॉम पदवी घेतली. त्यानंतर नागपूर विद्यापीठातून त्यांनी एम.कॉम केले. पुढे त्यांनी नागपूरच्या युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लॉ मधून एल.एल.बी आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. वकिलीची पदवी घेतली असली तरी त्यांनी वकिली न करता पूर्ण वेळ समाजकारण आणि राजकारणात स्वतःला झोकून दिले.

राजकीय कारकीर्दीची सुरुवात

नितीन गडकरी यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात विद्यार्थी दशेतच झाली. 1976 मध्ये त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रवेश केला. आणीबाणीच्या काळात त्यांनी संघर्ष केला. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी 1981 मध्ये ते भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष बनले. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे त्यांना 1989 मध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून येण्याची संधी मिळाली. ते सलग 4 वेळा विधानपरिषदेवर निवडून आले.

महाराष्ट्रातील काम - फ्लायओव्हर मॅन

1995 मध्ये महाराष्ट्रात युतीचे सरकार आले तेव्हा वयाच्या 38 व्या वर्षी त्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद मिळाले. या 4 वर्षात त्यांनी महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला. मुंबईतील 55 उड्डाणपूल, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जो भारतातील पहिला सहा पदरी कॉंक्रीट रस्ता होता, हा त्यांच्याच कल्पनेतून साकार झाला. म्हणूनच त्यांना फ्लायओव्हर मॅन म्हटले जाऊ लागले. त्यांनीच ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा आराखडा तयार केला होता, ज्याचे श्रेय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना दिले होते. 1999 ते 2005 पर्यंत ते विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते होते.

राष्ट्रीय राजकारणात झेप

2009 मध्ये वयाच्या 52 व्या वर्षी ते भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष बनले. 2014 मध्ये ते पहिल्यांदा नागपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आणि मोदी सरकारमध्ये त्यांना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रीपद मिळाले. 2014 पासून आजपर्यंत ते सलग तीन वेळा या पदावर आहेत. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गाची लांबी 91 हजार किमी वरून 1 लाख 45 हजार किमी पेक्षा जास्त झाली आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे, भारतमाला प्रोजेक्ट, इथेनॉल आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन हे त्यांचे महत्त्वाचे निर्णय आहेत. उद्योजक म्हणून पूर्ती ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना आणि इथेनॉल प्लांट देखील उभा केला आहे.

नितीन गडकरी हे राजकारणापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात.

माहिती स्रोत : इंटरनेट