मोठी बातमी ! नागपूरमध्ये गणेशोत्सवात DJ, लेझर लाईटवर बंदी ; पुण्यानंतर आता विदर्भातही DJ मुक्त उत्सवाची मागणी जोरात - टॉप न्यूज मराठी

सध्या राज्यात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरातील गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताच्या तयारीला लागली आहेत. पण दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवात सर्वात चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे डीजे आणि लेझर लाईट बंदी. पुण्यात विद्यानंद बापट यांनी डीजे बंदीची मागणी केल्याने वाद पेटला असतानाच, आता नागपूरमध्येही मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूरमध्ये काय निर्णय झाला ?

नागपूर पोलीस आयुक्तालयाकडून यंदा गणेशोत्सवासाठी कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये गणेशोत्सव काळात डीजे वाहन, डीजे सिस्टीम, डिम लाईट आणि डोळ्यांना घातक असलेल्या लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. यासाठी नागपूरचे माजी महापौर आणि माजी आमदार संदीप जोशी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी सिटीझन पिटीशन आणि स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना प्रचंड त्रास होतो. आनंद साजरा करायला विरोध नाही, पण पारंपरिक ढोल-ताशा, बँड, संबळ आणि भजनाच्या नादात उत्सव साजरा करावा, अशी त्यांची मागणी आहे. 

महाराष्ट्रात सध्या काय सुरू आहे ?

पुण्यातून सुरू झालेल्या या वादाने आता संपूर्ण महाराष्ट्रात जनचळवळीचे रूप घेतले आहे.

1. पुण्यातील वाद: पुणे महापालिकेच्या पूर्वतयारी बैठकीत नारायण पेठेतील विद्यानंद बापट यांनी डीजे मुक्त गणेशोत्सवाची मागणी केली. त्यावरून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बैठकीतून ओढत बाहेर काढले होते. त्यानंतर बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याने हा मुद्दा आणखी पेटला.

2. पुणे पोलिसांची भूमिका: पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, न्यायालयाने डीजेवर बंदी घातलेली नाही, तर आवाजाच्या मर्यादेवर (डेसिबल) मर्यादा घातली आहे. तरीही यंदा विसर्जन मिरवणुकीत लेझर बीम आणि प्लाझ्मा लाईट न वापरण्याबाबत मंडळांनी स्वतःहून सहमती दर्शवली आहे. तसेच यंदा शासनाने 4 दिवस - दीड दिवस विसर्जन, 5 दिवस विसर्जन, गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला सूट दिली आहे.

3. राज्यभरात दोन गट: एका बाजूला नागरिक आणि पर्यावरणप्रेमी डीजे मुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला विरोध करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला काही गणेश मंडळे आणि डीजे व्यावसायिक म्हणत आहेत की, "पब पहाटेपर्यंत सुरू राहतात, मग आमच्या उत्सवातील डीजे वरच बंदी का?"

एकंदरीत, यंदाचा गणेशोत्सव हा फक्त भक्तीचा नसून डीजे वाजवायचा की नाही, या वादाचाही ठरणार आहे.