गणेशोत्सवात DJ विरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला; पुण्यात डीजे वाजवण्यावरून दोन गट, नेमके कोण आहेत विद्यानंद बापट ? - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुण्यात डीजे वादातून डीजे विरोधक विद्यानंद बापट यांच्यावर आज हल्ला झाला. विद्यानंद बापट माध्यमांशी संवाद साधताना काही तरुणांनी धावत येऊन त्यांना मारहाण केली. ही घटना काही वेळापूर्वी टिळक रोडवर घडली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं ?

पुण्यात गणेशोत्सवात डीजे वाजवण्यावरून दोन गट पडले आहेत. विद्यानंद बापट हे डीजे विरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. बापट हे पुण्यातील टिळक रोडवर माद्ध्यांशी संवाद साधत होते. त्याचवेळी अचानक काही तरुण तिथे आले आणि त्यांनी बापट यांना शिवीगाळ करत हल्ला केला. व्हिडिओमध्ये एक हल्लेखोर "तुला कोणी ऑब्जेक्शन घ्यायला सांगितलय, मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या" असे ओरडताना ऐकू येत आहे. हल्ल्यानंतर बापट म्हणाले की, मी निशस्त्र होतो आणि तिथे पोलीस नाहीत हे पाहून त्याने प्रसिद्धीसाठी हा हल्ला केला. तसेच मुद्द्याचे उत्तर मुद्द्याने द्यायचे असते, गुद्याने नाही, असेही ते म्हणाले.

पोलिसांनी काय ॲक्शन घेतली ?

घटनेनंतर विद्यानंद बापट यांनी पुणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी घटनेचे फुटेज ताब्यात घेतले असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. "फुटेज तुमच्याकडे आहे, ते पाहून पोलिसांना कारवाई करू द्या, पोलीस त्यांचे काम करतील" असे बापट यांनी म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमके कोण आहेत विद्यानंद बापट ? 

ते कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. विविध परिवर्तनवादी संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये ते सक्रिय आहेत. लोकहिताचे मुद्दे, ध्वनी प्रदूषण आणि नागरी समस्यांवर ते सातत्याने आवाज उठवतात.चर्चेत का आले? गणेशोत्सव 2026 च्या पूर्वतयारीसाठी पुणे महापालिकेने घेतलेल्या बैठकीत त्यांनी डीजे आणि कर्णकर्कश लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली. गणेशोत्सवाला 125 वर्षांची परंपरा आहे, तर लाऊडस्पीकरचा वापर गेल्या 35-40 वर्षांत सुरू झाला, त्यामुळे तो परंपरेचा भाग नाही असा मुद्दा त्यांनी मांडला. या बैठकीतील त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ते राज्यभर चर्चेत आले.