मुंबई : मुंबईमधून एक भलताच प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी डीसीपी डॉक्टर राज खातीब यांनी एका व्यक्तीला कार घेण्यासाठी लोन मिळवून देण्यासाठी त्याच्याकडून दहा लाख रुपये घेतले. पण बरेच दिवस झाले लोन मिळाले नाही म्हणून हा संबंधित व्यक्ती पोहोचला थेट कमिशनर ऑफिसला. राज खातीब यांना भेटायचं आहे म्हटल्यावर त्याच्या आणि पोलीस खात्याच्या पायाखालची जमीनच सरकली. अशा नावाची कोणी व्यक्तीच नाही हे कळाल्यानंतर या संबंधित व्यक्तीने अक्षरशः हाय तोबाचं केला.
या व्यक्तीने जेव्हा त्याच्याबरोबर घडलेला प्रसंग सांगितला त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या तपासाची चक्र सुरू केली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ३ ने या आरोपीला पकडण्यासाठी तब्बल 48 लाख रुपयांच्या एका नवीन डीलचा बहाणा केला. त्यानंतर डीसीपी डॉक्टर राज खतीब यांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवण्यात आलं. डीसीपी सर पोहोचले देखील आणि या डीसीपी साहेबांना अखेर गुन्हे शाखेने जेरबंद केल आहे. सगळ्यात मोठा खुलासा म्हणजे हे डीसीपी सर साधे तोतया पोलीस नव्हते बर का ! तर स्वतः लोहमार्ग पोलिसांमध्ये सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं खरं नाव आहे सहाय्यक फौजदार मोहम्मद गौस इब्राहिम खतीब...
या सहाय्यक फौजदार साहेबांनी ते स्वतः सेलिब्रिटी असल्याचा बहाणा करून आजपर्यंत अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याच देखील उघडकीस आले. बर केवळ लाखोंचा गंडाच घातला असं नाही. डीसीपी साहेबांनी आत्तापर्यंत बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ अशा अभिनेत्यांसोबत फोटो देखील घेतले आहेत. अशाच उच्चभ्रू लोकांसोबत काढलेल्या फोटोमुळे सामान्य लोक देखील या तोतया डीसीपीच्या जाळ्यात अडकत होते.
अखेर आता गुन्हे शाखेनं स्वतःलाच डीसीपी घोषित केलेल्या या सहाय्यक फौजदाराला अटक केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.