दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत, मुंबई हायकोर्टाने दिले CBI चौकशीचे आदेश; आदित्य ठाकरेंचे नाव का येतेय ? - टॉप न्यूज मराठी

मुंबई : युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर मौन सोडले आहे. या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही, त्यावर बोलून काय अर्थ आहे, असे संक्षिप्त वक्तव्य त्यांनी केले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या तपासाबाबत विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

काय आहे दिशा सालियन प्रकरण ?

दिशा सालियन या अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या माजी मॅनेजर होत्या. 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मुंबई पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अहवाल म्हणजेच ADR दाखल केला होता. यानंतर सहा दिवसांनी 14 जून रोजी सुशांत सिंग राजपूत याचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये आढळला होता. या दोन्ही मृत्यूंचा एकमेकांशी संबंध असल्याची चर्चा त्यावेळी सुरू झाली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात घातपाताचा पुरावा नाही असे म्हटले होते, मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने या तपासातील विसंगतींवर ताशेरे ओढत CBI ला FIR दाखल करून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, सहा वर्षे केवळ ADR वर तपास करणे आणि घटनास्थळाचा पंचनामा करण्यास उशीर करणे हे गंभीर आहे.

या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव नेमके का येते ? 

या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे त्यांचे नाव चर्चेत आले. भाजपच्या काही नेत्यांनी सातत्याने या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली होती. तसेच दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी मार्च 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मुलीवर अत्याचार करून हत्या झाल्याचा आणि राजकीय दबावातून प्रकरण दाबल्याचा आरोप केला. त्यांच्या तक्रारीत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह काही जणांची नावे घेतली होती. मात्र हे आरोप सिद्ध झालेले नाहीत. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, तपास अधिकाऱ्याला ठोस पुरावे मिळाल्याशिवाय कोणालाही केवळ आरोपांच्या आधारे आरोपी म्हणून वागवू नये.

यावर आदित्य ठाकरे यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, " गेल्या पाच वर्षांपासून माझी प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे. सतीश सालियन यांनी दाखल केलेली याचिका ही खोटी, निराधार आणि हेतूने प्रेरित आहे. मी माझी बाजू न्यायालयात कायदेशीर पद्धतीने मांडेन. या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्यासाठी माझे नाव जोडले जात आहे. " असेही त्यांनी आणि शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे.