पुण्यात उद्या दत्तक कार्यशाळा ! विशेष गरजा असलेल्या मुलांना कुटुंब मिळवून देण्यासाठी CARA चा पुढाकार - टॉप न्यूज मराठी

पुणे : विशेष गरजा असलेल्या (दिव्यांग) बालकांचे दत्तक विधान बळकट करण्यासाठी केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण (CARA), नवी दिल्ली तर्फे उद्या गुरुवार, 3 सप्टेंबर रोजी पुण्यात पश्चिम विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा CARA च्या 2025 च्या दत्तक जनजागृती मोहिमेचा एक भाग असून "विशेष गरजा असलेल्या बालकांचे संस्थाबाह्य पुनर्वसन" या संकल्पनेवर आधारित आहे. प्रत्येक बालकाला सुरक्षित आणि प्रेमळ कुटुंबात वाढण्याची संधी मिळावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

पश्चिम विभागात महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो. या कार्यशाळेत 74 पेक्षा जास्त जिल्ह्यांतील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. बालकांना संस्थेत जास्त काळ ठेवण्याऐवजी कुटुंबावर आधारित संगोपनाला प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे.

या कार्यशाळेत राज्य दत्तक स्रोत संस्था (SARA), विशेष दत्तक संस्था (SAA), बालगृहे (CCI), जिल्हा बाल संरक्षण कक्ष (DCPU), मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) आणि बाल संरक्षण क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

विशेष गरजा असलेल्या बालकांच्या दत्तकाबाबत प्रत्येक राज्याची सद्यस्थिती, येणाऱ्या अडचणी, यशस्वी कथा आणि उपाययोजना यावर चर्चा होणार आहे. तसेच वैद्यकीय, कायदेशीर, आर्थिक आणि तक्रार निवारणासंबंधी अडचणींवर मार्गदर्शन केले जाणार आहे.