जर्मनीची प्रसिद्ध लक्झरी कार उत्पादक कंपनी BMW ने भारतीय वाहन बाजारात आपली पकड अधिक घट्ट करण्यासाठी एक नवीन पाऊल उचलले आहे. कंपनीची अत्यंत लोकप्रिय आणि सर्वाधिक विक्री होणारी SUV 'BMW X1' आता एका अधिक प्रशस्त आणि मोठ्या अवतारात सादर केली जात आहे. 'BMW X1 Long Wheelbase (LWB)' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नव्या गाडीचे अधिकृत बुकिंग आता सुरू झाले आहे. ही गाडी २१ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय बाजारात अधिकृतपणे लाँच केली जाणार आहे.
या नव्या कारचे उत्पादन भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत BMW ग्रुपच्या चेन्नई येथील प्लांटमध्ये केले जाणार आहे. ज्या ग्राहकांना अधिक आरामदायी आणि मोठी कार हवी आहे, ते कंपनीच्या अधिकृत डीलरशिपला भेट देऊन किंवा ऑनलाईन पोर्टलवरून ही गाडी बुक करू शकतात.
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या स्टँडर्ड BMW X1 ची एक्स-शोरूम किंमेंट ५०.९० लाख ते ५२.९० लाख रुपयांच्या दरम्यान आहे. लाँग व्हीलबेस (LWB) मॉडेलमध्ये अतिरिक्त जागा आणि नवीन फीचर्स मिळणार असल्यामुळे, या कारची अंदाजे किंमत ₹५१ लाख ते ₹५५ लाख (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे. ही कार प्रामुख्याने M Sport ट्रिमसह पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. BMW X1 LWB भारतीय ग्राहकांसाठी अल्पाइन व्हाईटब्लॅक सॅफायर मेटॅलिक, एम पोर्टिमाओ ब्लू मेटॅलिक, स्पेस सिल्वर मेटॅलिक, स्टॉर्म बे मेटॅलिक, या प्रीमियम आणि आकर्षक रंगांमध्ये सादर केली जाऊ शकते:
स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत ही कार ११६ मिमीने अधिक लांब असून तिचा व्हीलबेस ११० मिमीने वाढवला आहे. यामुळे मागील सीटवरील प्रवाशांना उत्कृष्ट लेगरूम आणि कमालीचा आराम मिळतो. मागील सीट्स आधीपेक्षा २७ मिमी उंच करण्यात आल्या आहेत. तसेच, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी यात ५४० लिटरची मोठी बूट स्पेस (सामान ठेवण्याची जागा) देण्यात आली आहे. कारच्या आत १०.७ इंचाचा मोठा सेंट्रल टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले आणि ड्रायव्हरसाठी १०.२५ इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर एकत्र जोडून 'BMW कर्व्हड डिस्प्ले' देण्यात आला आहे. गाण्यांचा उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी यात Harman Kardon ची हाय-एंड ऑडिओ सिस्टम बसवण्यात आली आहे. यामध्ये पॅनोरॅमिक ग्लास सनरुफ, वायरलेस चार्जिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, डिजिटल की सुविधा आणि पॉवर्ड टेलगेट यांसारखे फीचर्स समाविष्ट आहेत.
जागतिक बाजारातील ट्रेंड पाहता, या गाडीत २.०-लिटर ४-सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन मिळण्याची दाट शक्यता आहे, जे २०४ bhp ची ताकद आणि ३०० Nm चा टॉर्क निर्माण करते. हे इंजिन ७-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले असेल, ज्यामुळे गाडी अवघ्या ७.९ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडू शकते.