मुंबई : राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बीएचएमएस पदवीधरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्याच्या प्रक्रियेवर सरकारने तात्पुरती थांब दिली आहे. कोर्टाचा अंतिम निकाल हाती येईपर्यंत ही नोंदणी सुरू केली जाणार नाही, असे वैद्यकीय शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 3 ऑगस्ट रोजी जारी झालेल्या शासन आदेशानुसार बीएचएमएस डॉक्टरांना MMC मध्ये नाव नोंदवता येणार होते. त्यानंतर मुंबईत होमिओपॅथी डॉक्टरांनी मोठे आंदोलन केले होते. मात्र या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशन आणि सेंट्रल मार्ड या ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यांच्या मते होमिओपॅथी डॉक्टरांना MMC मध्ये समाविष्ट करणे योग्य नाही.
या दोन्ही बाजूंच्या मतप्रवाहांमुळे वैद्यकीय क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. यापूर्वी झालेल्या डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचे लक्षात घेऊन सरकारने मध्यस्थीची भूमिका घेतली.
वैद्यकीय शिक्षण विभागाने यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे की, सध्याचे वातावरण शांत होईपर्यंत आणि नोंदणीची स्पष्ट कार्यपद्धती ठरेपर्यंत ही प्रक्रिया पुढे ढकलणे आवश्यक आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या विषयावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे कोर्टाचा अंतिम आदेश येईपर्यंत बीएचएमएस डॉक्टरांची MMC मधील नोंदणी करणे योग्य होणार नाही, असे शासनाने नमूद केले आहे.
आता या संपूर्ण प्रकरणाचा निकाल उच्च न्यायालयात काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरच बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीबाबत पुढील पावले उचलली जातील. या निर्णयामुळे होमिओपॅथी डॉक्टरांमध्ये नाराजी असली तरी, रुग्णसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील एकमतासाठी सरकारने हा तात्पुरता तोडगा काढल्याचे दिसून येत आहे.