पुणे जिल्ह्याच्या गणेशोत्सवाची परंपरा जगासमोर आणा, Bappa.org वर आठवणी शेअर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - टॉप न्यूज मराठी

पुणे : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा मानबिंदू असलेल्या गणेशोत्सवाला राज्य सरकारने राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. या उत्सवाच्या परंपरा आणि वैशिष्ट्ये जगासमोर आणण्यासाठी शासनाने Bappa.org हा अधिकृत डिजिटल मंच सुरू केला आहे. पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या अनोख्या परंपरांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करून हा ठेवा पुढील पिढीसाठी जतन करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. शहरातील मानाचे गणपती असोत किंवा ग्रामीण भागातील घरगुती गणेशोत्सव, प्रत्येक ठिकाणी वेगळी प्रथा आणि परंपरा जपली जाते. अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आरत्या, नैवेद्याच्या पाककृती आणि सजावटीच्या पद्धती आजही जपल्या जातात. या सर्वांचे जतन Bappa.org च्या माध्यमातून होणार आहे.

या पोर्टलवर काय शेअर करता येणार

  • नागरिकांना आपल्या घरातील किंवा सार्वजनिक मंडळातील गणेशोत्सवाशी संबंधित आठवणी, अनुभव, फोटो, आरत्यांचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग, नैवेद्य आणि पारंपरिक पाककृतींची माहिती अपलोड करता येणार आहे.
  • जिल्हाधिकारी म्हणाले, आपल्या बाप्पाची कथा जगासमोर मांडा. पुणेकरांनी आपल्या घरातील, गावातील आणि परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण परंपरा Bappa.org वर शेअर कराव्यात आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

या उपक्रमामुळे पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाचे वैभव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे.