महाराष्ट्रात सध्या सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. एप्रिलच्या अखेरीस विदर्भासह राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पार गेला आहे. पण, अशा भीषण परिस्थितीत राज्य परीक्षा परिषदेने आयोजित केलेली शिष्यवृत्ती परीक्षा चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी अक्षरशः ‘अग्निपरीक्षा’ ठरत आहे. अकोला, अमरावतीसह संपूर्ण विदर्भात उन्हाचा कडाका असताना, दुपारच्या सत्रात परीक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू आहे का? असा संतप्त सवाल आता पालक विचारत आहेत. अकोला, अमरावती आणि नागपूर... संपूर्ण विदर्भ सध्या उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत आहे. मात्र, याच भीषण उन्हात इयत्ता चौथी आणि सातवीच्या हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरं जावं लागतंय. सकाळी ११ ते १२:३० आणि विशेषतः दुपारी २ ते ३:३० या भर उन्हाच्या वेळेत पेपर असल्याने चिमुकल्यांचे हाल होत आहेत.अनेक परीक्षा केंद्रांवर सावलीची सोय नाही, कुठे पंखे बंद आहेत, तर कुठे पिण्याच्या पाण्याचीही वानवा आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती तर यापेक्षाही भयानक आहे. कडक उन्हामुळे काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावरच आजारी पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी पालक धास्तावलेले असून, प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.