व्यक्तिविशेष : दुबईहून तेल अवीव विमान वाचवणारे कॅप्टन 'स्मित मच्छर' कोण आहेत, 9750 तास उड्डाणाचा अनुभव, को पायलटच्या चाकू हल्ल्यानंतरही 174 जणांचे वाचवले प्राण - टॉप न्यूज मराठी

आजचा व्यक्तिविशेष आहे भारतीय हिरो कॅप्टन स्मित मच्छर यांचा. दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या FZ1073 या विमानात जो थरार घडला त्याने संपूर्ण जग हादरले आहे. पण या थरारात एका भारतीय पायलटने दाखवलेल्या शौर्यामुळे 174 प्रवाशांचा जीव वाचला आहे.

कोण आहेत स्मित मच्छर

स्मित मच्छर हे मूळचे मुंबईतील घाटकोपर पूर्व भागातील रहिवासी आहेत. त्यांचे कुटुंब अजूनही मुंबईतच राहते. त्यांचा भाऊ देखील पायलट आहे आणि तो सध्या अकासा एअरमध्ये काम करतो. स्मित यांनी सुरुवातीला टेक्स्टाईल इंजिनिअरिंग आणि नंतर वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले होते. पण वयाच्या 19 व्या वर्षी त्यांना पायलट होण्याची आवड निर्माण झाली आणि त्यांनी या क्षेत्रात करिअर केले. 

शिक्षण आणि करिअर

स्मित मच्छर यांच्याकडे बोईंग 737 विमानावर सुमारे 9750 तास उड्डाण केल्याचा अनुभव आहे. यात बोईंग 737-800 आणि 737 MAX 8 / 9 या दोन्ही विमानांचा समावेश आहे.  ते जून 2022 मध्ये फ्लाय दुबईमध्ये डायरेक्ट एन्ट्री कॅप्टन म्हणून रुजू झाले. त्याआधी त्यांनी भारतातील स्पाईसजेटमध्ये सुमारे 11 वर्षे काम केले होते. स्पाईसजेटमध्ये ते सिनियर कमांडर होते आणि नंतर नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांना लाईन ट्रेनिंग कॅप्टन बनवण्यात आले होते, जिथे ते इतर पायलटना ट्रेनिंग आणि तपासणीचे काम करत होते. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाईलवर त्यांनी स्वतःचे वर्णन एअरलाईन कॅप्टन, लाईफलॉंग लर्नर, फादर असे केले आहे.

नेमके काय घडले दुबई ते तेल अवीव फ्लाईटमध्ये

  • 30 सप्टेंबर रोजी फ्लाय दुबईचे FZ1073 हे विमान दुबईहून तेल अवीवला जात होते. विमानात 174 लोक होते, त्यात 27 लहान मुले होती. विमान जेव्हा जॉर्डनच्या आकाशात होते तेव्हा अचानक कॉकपिटमध्ये दोन पायलटमध्ये झटापट सुरू झाली.

  • मिळालेल्या माहितीनुसार, को पायलट जो ओमानचा नागरिक असल्याचे सांगितले जाते त्याने कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर चाकूने हल्ला केला. या झटापटीत विमानाने 14 हजार फुटांपेक्षा जास्त उंची अवघ्या 29 सेकंदात गमावली. फ्लाईटरडारच्या डेटानुसार विमान 34 हजार फुटांवरून थेट 20 हजार फुटांवर आले. 

  • विमानाने आधी 7700 हा इमर्जन्सी कोड आणि 7 मिनिटानंतर 7500 हा हायजॅकचा कोड पाठवला. त्यामुळे इस्रायलने फायटर जेट देखील रवाना केले होते.

  • या गंभीर जखमी अवस्थेतही कॅप्टन स्मित मच्छर यांनी धाडस दाखवले. ते कॉकपिटच्या जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतानाही त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा बटण दाबला. त्यामुळे प्रवासी आणि क्रू मेंबर्सना कॉकपिटमध्ये येता आले आणि त्यांनी हल्लेखोर को पायलटला ताब्यात घेतले. प्रवाशांनी त्याला हेडफोन आणि झिप टायने बांधून ठेवले.

  • त्यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग सौदी अरेबियातील तबुक येथे करण्यात आले. तिथे स्मित मच्छर यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे. 

कोणी कोणी केले कौतुक

  • इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्मित मच्छर यांना सच्चा नायक म्हटले आहे. गंभीर जखमी असतानाही त्यांनी लढा दिला, कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि प्रवाशांना आत येऊन हल्लेखोराला रोखण्यास मदत केली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असे नेतान्याहू यांनी X वर लिहिले आहे.

  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे कौतुक केले आहे. कॅप्टन स्मित मच्छर हिरो आहेत. जीवाला धोका असतानाही त्यांनी इतरांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी अतुलनीय धैर्य दाखवले असे मोदी म्हणाले.

  • केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राम मोहन नायडू यांनीही त्यांच्या शौर्याचा आम्हाला अभिमान आहे असे म्हटले आहे.

  • एका वर्षापूर्वी एका पॉडकास्टमध्ये स्मित मच्छर यांनी सांगितले होते की वर आकाशात काही घडले तर तुम्हाला कोण वाचवेल, एअर क्रूच तुमचा जीव वाचवू शकतात. त्यांचा हाच शब्द आज खरा ठरला आहे.

  • त्यांचा एक दुसरा विचारही खूप व्हायरल होत आहे. उशीर होणे ही माझी समस्या नाही. तुम्ही विमानातून सुखरूप बाहेर पडता हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे असे ते नेहमी म्हणायचे.

  • सध्या फ्लाय दुबईने तेल अवीवसाठीची सर्व उड्डाणे तपास पूर्ण होईपर्यंत स्थगित केली आहेत. सौदी अरेबियाचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.