कुपोषित बालकांच्या टीबी तपासणीत महाराष्ट्र अव्वल, फडणवीस सरकारच्या मोहिमेमुळे तपासणी 94 टक्क्यांवर - टॉप न्यूज मराठी

मुंबई : राज्यातील कुपोषित बालकांमधील क्षयरोगाचे वेळीच निदान व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये दाखल होणाऱ्या बालकांची टीबी तपासणी आता 90 टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे.

2021 ते जुलै 2026 पर्यंत पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये 29 हजार 875 बालके दाखल झाली होती, त्यापैकी 26 हजार 857 बालकांची टीबी तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. हे प्रमाण 89.9 टक्के आहे. तर 2026 मध्ये जुलैपर्यंत दाखल 3017 बालकांपैकी 2835 बालकांची तपासणी झाली असून हे प्रमाण 94 टक्क्यांवर गेले आहे. विशेष म्हणजे तपासणी वाढली असली तरी टीबीचे रुग्ण कमी होत आहेत. 2022 मध्ये 23 बालकांना टीबी झाला होता, तर 2025 मध्ये हा आकडा 7 वर आला आहे आणि यावर्षी जुलैपर्यंत फक्त 3 बालकांमध्ये टीबी आढळला आहे.

या बालकांसाठी आता सीबी नॅट, ट्रूनॅट तपासणी आणि छातीचा एक्सरे या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच टीबीच्या संपर्कात आलेल्या पण लक्षणे नसलेल्या बालकांना प्रतिबंधात्मक उपचार दिले जात आहेत. सर्व माहिती आता निक्षय पोर्टलवर जोडली जात असून टीबी झालेल्या बालकांना निक्षय पोषण योजना अंतर्गत मदतही दिली जात आहे.