बॉलीवूडमध्ये आज : श्वेता तिवारी - राजा चौधरी वाद पुन्हा पेटला, पलक, कौटुंबिक हिंसाचार, विवाहबाह्य संबंध ते 93 लाखांच्या फ्लॅटपर्यंतचे गंभीर आरोप - टॉप न्यूज मराठी

मुंबई : टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा माजी पती राजा चौधरी यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा सोशल मीडियावर आणि चर्चेत आला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत राजा चौधरी यांनी अनेक धक्कादायक दावे केले असून त्यामुळे या दोघांच्या नात्याबत पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

राजा चौधरी यांनी नेमके काय आरोप केले ?

राजा चौधरी यांनी सांगितले की त्यांची मुलगी पलक तिवारी त्यांना वडील म्हणून स्वीकारत नाही. त्यांना भेटण्यापासून रोखण्यात आले असल्याचा दावा त्यांनी केला. 2007 मध्ये घटस्फोटाच्या वेळी श्वेता तिवारीने कौटुंबिक हिंसाचार आणि मद्यपानाचा आरोप केला होता. तो आरोप राजा यांनी पूर्णपणे फेटाळून लावला. "मी कधीही श्वेतावर हात उचलला नाही" असे ते म्हणाले.राजा यांनी सर्वात मोठा आरोप करताना सांगितले की श्वेताचे 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील सहकलाकार सेजान खान यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. या आरोपावर श्वेता तिवारीने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.घटस्फोटावेळी पलकपेक्षा 93 लाखांच्या फ्लॅटला प्राधान्य दिले असा आरोप होता. त्यावर राजा म्हणाले की न्यायालयाने भेटीची परवानगी दिली होती पण ती कधीच मिळाली नाही. तसेच अनेक कायदेशीर प्रकरणांमुळे राहण्यासाठी घर मिळणे कठीण झाले होते, म्हणून तडजोड म्हणून फ्लॅट स्वीकारला.

वादानंतर श्वेताची पहिली पोस्ट व्हायरल

राजा यांच्या आरोपांनंतर श्वेता तिवारीने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली. ही पोस्ट तिच्या आगामी रिअॅलिटी शो 'ट्रेटर्स 2' शी संबंधित आहे. पोस्टमध्ये तिने लिहिले, "यावेळी खरी कसोटी म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा हे ओळखणे." त्यामुळे तिने अप्रत्यक्षपणे यावर उत्तर दिले का याबत चाहते चर्चा करत आहेत.

'ट्रेटर्स 2' मध्ये श्वेतासोबत मुनव्वर फारुकी, रिया चक्रवर्ती, दलीप ताहिल, पारुल गुलाटी, इक्का, साहिल सलाथिया आणि रिदा थराना हे कलाकार देखील दिसणार आहेत.

श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांचा विवाह 1998 मध्ये झाला होता. 2007 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यावेळी श्वेताने राजा यांच्या मद्यपान आणि कौटुंबिक हिंसाचारामुळे वेगळे झाल्याचे सांगितले होते. घटस्फोटानंतर पलक श्वेतासोबत राहते. सध्या दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू असून या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. श्वेता तिवारी यावर अधिकृतपणे काय बोलते याकडे सर्वांचे लक्ष आहे.