आरोग्य : दिवाळीपुरते नाही, रोज अभ्यंगस्नान केले तर काय होईल, 90 टक्के ताण कमी होतो, हृदय मजबूत होते, डॉक्टरही सांगतात हे 8 फायदे - टॉप न्यूज मराठी

भारताचे आयुर्वेद शास्त्र हे जगातील सर्वात प्रगत शास्त्र आहे. आयुर्वेद फक्त औषधांवर चालत नाही, तर व्यायाम, मसाज आणि वनस्पतींच्या उपयोगाने माणसाला निरोगी आणि सुदृढ आयुष्य कसे जगता येईल, हे सांगते. आयुर्वेदातील अनेक गोष्टी आज आपण परंपरा म्हणून पाळतो. त्यातीलच एक म्हणजे दिवाळीचे अभ्यंगस्नान.

अभ्यंगस्नान हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे. अभ्यंग म्हणजे तेलाने केलेली मालिश आणि स्नान म्हणजे अंघोळ. आपण वर्षातून एकदाच नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करतो. पहाटे सूर्योदयापूर्वी उठून, अंगाला तिळाचे तेल लावून मालिश करून, औषधी उटण्याने अंघोळ करतो. हे फक्त परंपरा नाही, तर दररोज अभ्यंगस्नान करणे हा एक अतिशय लाभदायी फिटनेस मंत्र आहे.

अभ्यंगस्नान हे नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान केल्याने सगळी मरगळ आणि आळस निघून जातो. जो उत्साह आणि तरतरी येते, त्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही. चला तर मग पाहूया, अभ्यंगस्नानाचे वैज्ञानिक फायदे काय आहेत.

1. तणावातून मिळते 90 टक्के मुक्ती

2011 साली 20 माणसांवर आणि 2018 साली 44 स्त्रियांवर करण्यात आलेल्या संशोधनातून असे समोर आले आहे की, अभ्यंगस्नानाच्या वेळी सुगंधी तेलाने केलेल्या मालिशने आपला ताण 90 टक्के पर्यंत कमी होतो. आजच्या धावपळीच्या आयुष्यात ताण हाच सगळ्या आजारांचे मूळ कारण आहे. रोज 10 मिनिटे मालिश केली तर मन शांत होते, झोप चांगली लागते आणि चिडचिड कमी होते.

2. हृदयविकारांपासून मिळतो बचाव

ताणाचा आपल्या चेतासंस्थेवर म्हणजेच नर्व्हस सिस्टिमवर अतिशय नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे हृदयाचे विकार होऊ लागतात. अभ्यंगस्नानाच्या वेळी केलेल्या तेलाच्या मालिशने आणि सुगंधी उटण्यामुळे ताण कमी होतो. हृदयाच्या नसा आणि रक्तवाहिन्या मोकळ्या होऊन रक्ताभिसरण सुरळीत होते. त्यामुळे हार्ट अटॅक, ब्लॉकेज असे हृदयविकार टाळले जातात.

3. रक्तदाबाचा त्रास होतो नाहीसा

अनेक वैज्ञानिकांनी अंगाच्या मालिशचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात, यावर संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनानुसार, अभ्यंगस्नानाच्या वेळी केल्या जाणाऱ्या विविध तेलांच्या मालिशने रक्तवाहिन्या रुंदावतात आणि मोकळ्या होतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होऊन हायपरटेन्शन आणि रक्तदाबाचा त्रास नाहीसा होतो. ज्यांना बीपीचा त्रास आहे, त्यांनी रोज हलकी मालिश नक्की करावी.

4. त्वचेचे सौंदर्य खुलते

दिवाळी हिवाळ्यात येते, तेव्हा त्वचा कोरडी होऊन फाटणे, भेगा पडणे हे त्रास सुरू होतात. पण अशा वेळी तेलाने मालिश करून ते तेल अंगात मुरू दिल्यास हे त्रास कमी होतात. अभ्यंगस्नानात सोबतीला उटणे असतेच. त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे त्वचेला येणारी खाज कमी होते. कोणत्याही प्रकारची अॅलर्जी किंवा इन्फेक्शन झालेले असेल, तर ते नाहीसे होते. त्वचेवर सुरकुत्या येणे, डाग येणे आणि म्हातारपणाची लक्षणेही कमी होतात.

तुमच्या त्वचेनुसार तेल निवडा

कोरड्या त्वचेसाठी - बदाम, तीळ आणि अॅव्होकॅडोच्या तेलाचा वापर करावा.

सेन्सिटिव्ह त्वचेसाठी - तूप किंवा सूर्यफुलाच्या तेलाचा वापर करावा.

तेलकट त्वचेसाठी - जवसाचे किंवा सूर्यफुलाच्या तेलाचा वापर केल्यास उत्तम परिणाम मिळतील.

5. स्नायू आणि सांधे होतात मोकळे

अभ्यंगस्नानात डोक्यापासून पायाच्या टाचेपर्यंत संपूर्ण अंगाची तेल लावून मालिश केली जाते. त्या तेलाच्या मालिशने आणि उटण्याच्या रवाळ दाण्यांनी आपले अकडलेले स्नायू आणि सांधे दोन्ही मोकळे होतात. त्यांना तेल मिळून ते सुरळीतपणे आपली कार्ये करू शकतात. ज्यांना पाठदुखी, मान दुखणे, गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांना याचा खूप फायदा होतो.

6. हाडे होतात मजबूत

लहान मुलांची नियमित तेलाने मालिश करून अंघोळ घातली जाते, त्यांची हाडे बळकट व्हावीत, हे त्यामागील कारण आहे. पण आपण मोठे झालो की आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. पोटातून खाल्लेले कॅल्शियमच आपल्याला पुरेल, असा आपला समज होतो. पण ज्यांना हाडे आणि सांधे दुखण्याचा त्रास आहे, त्यांनी वेगवेगळ्या तेलांनी नियमित मालिश केल्यास त्यांची हाडे मजबूत होतील. मणक्यात गॅप येणे, अवेळी हाडे ठिसूळ होणे, शक्ती जाणे हे त्रास आपल्याला लवकर शिवणार नाहीत.

7. लिम्फॅटिक सिस्टिमसाठी गुणकारी

लिम्फॅटिक सिस्टिम ही आपल्या शरीरातील सगळ्या प्रकारची घाण शरीरातून बाहेर काढण्याची महत्वाची भूमिका बजावत असते. अभ्यंगस्नानाच्या वेळी केलेल्या मालिशने आणि नंतर अंगावर घेतलेल्या पाण्याने या सिस्टिमला भरपूर फायदा होतो. कोणाची शस्त्रक्रिया झाली असेल, तर कधी कधी या प्रक्रियेत अडथळा येऊन पाणी आपल्या शरीरातच साचू लागते. पण डोक्यापासून पायाच्या टाचेपर्यंत केलेल्या मालिशने हे पाणी आणि घाण अंगात साचून राहत नाही, ती बाहेर पडण्यास मदत होते.

8. शरीरासाठी इतर फायदे

याचबरोबर अभ्यंगाचे म्हणजेच मालिशचे भरपूर फायदे आहेत. जसे, दृष्टी सुधारते, स्फूर्ती आणि सतर्कता वाढते, शारीरिक शक्ती आणि बळ वाढते. रोज मालिश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि थकवा कमी होतो.

अभ्यंगस्नान करण्याची योग्य पद्धत कोणती

तेल कोमट करून घ्या आणि डोक्यापासून खालच्या अंगापर्यंत क्लॉकवाईज मालिश करत या. प्रत्येक अवयवाला 5 मिनिटे तरी द्यावीत. यानंतर अर्धा तास हे तेल अंगात मुरू द्या आणि मग अंघोळ करा. गाल, मान, पोट, तळपाय कोणताही अवयव अजिबात वगळू नका, सगळ्यांची योग्य मालिश करा. गर्भवती स्त्रियांनी, फ्रॅक्चर झालेल्यांनी आणि कोणतीही शारीरिक समस्या असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने अभ्यंगस्नान करावे.

औषधी अभ्यंग तेल घरच्या घरी कसे बनवावे

अभ्यंगस्नानाचे तेल तयार करताना फायदे दुप्पट होण्यासाठी तुम्ही त्यात हळद, कमळाचे मूळ, तुळशीची पाने आणि लवंग यापैकी काहीही घालू शकता.

कृती - थोडे तेल घेऊन ते गरम करायला ठेवा आणि त्यात वरील सामग्री घाला. 2 मिनिटे गरम करून गॅसवरून काढून घ्या आणि 24 तासांसाठी ते बाजूला ठेवून द्या. याने या सगळ्या सामग्रीचे गुण त्या तेलात उतरतील. दुसऱ्या दिवशी हे तेल पातळ कापडाने गाळून घ्या. हे तेल तुम्ही रोज वापरू शकता.

 दिवाळीपुरते अभ्यंगस्नान न करता, आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी ही सवय लावली, तर तुमचे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहील. महागड्या स्पा मध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरी केलेले अभ्यंगस्नान जास्त फायदेशीर आहे. तुम्ही शेवटचे अभ्यंगस्नान कधी केले होते, कमेंटमध्ये नक्की सांगा.