वास्तुशास्त्रानुसार घरात मनी प्लांट असेल तर पैसा वाढतो असे मानले जाते. त्यामुळे जवळपास प्रत्येक घरात एक तरी मनी प्लांट असतोच. पण अनेकांच्या घरात मनी प्लांट लावल्यानंतर काही दिवसातच त्याची पाने पिवळी पडतात, फांदी सुकून जाते आणि झाड मरून जाते. याचे कारण तुमची काळजी कमी आहे असे नाही तर तुम्ही लावताना एक मोठी चूक करता.
बहुतेक लोक करतात ती सगळ्यात मोठी चूक म्हणजे मनी प्लांटची फांदी थेट मोठ्या कुंडीत किंवा मोठ्या पाण्याच्या बाटलीत लावणे.
जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या झाडापासून एक छोटी फांदी आणून तिला लगेच मोठ्या कुंडीत लावता तेव्हा त्या छोट्या फांदीला तेवढ्या मोठ्या मातीतून पाणी आणि पोषण घेता येत नाही. मोठ्या कुंडीत पाणी जास्त राहते आणि मुळे कुजायला लागतात. त्यामुळे वरून पाने पिवळी पडून फांदी सुकते. हीच चूक पाण्यात लावतानाही होते. एका छोट्या फांदीला मोठ्या बाटलीत टाकल्याने तिला व्यवस्थित ऑक्सिजन मिळत नाही.
योग्य पद्धत कोणती आहे.
पहिली पायरी म्हणजे फांदीची निवड. नेहमी अशी फांदी निवडा ज्या फांदीवर कमीत कमी 3 ते 4 गाठ असतील. ती गाठ म्हणजे जिथून मुळे फुटतात. गाठ नसलेली सरळ काडी कधीही लावू नका ती जगत नाही.
दुसरी पायरी म्हणजे आधी मुळे फुटू द्या. आणलेली फांदी थेट मातीत लावू नका. एका छोट्या काचेच्या ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात फांदी ठेवा. फक्त खालची एक गाठ पाण्यात बुडेल इतकेच पाणी ठेवा. हा ग्लास उजेड येईल अशा ठिकाणी ठेवा पण थेट ऊन येणार नाही अशा ठिकाणी. दर 3 दिवसांनी पाणी बदला. 10 ते 15 दिवसात त्या गाठीतून पांढरी मुळे फुटलेली दिसतील.
तिसरी पायरी म्हणजे आता कुंडीत लावा. जेव्हा मुळे 2 ते 3 इंच वाढतील तेव्हा त्याला मातीत लावा. सुरुवातीला खूप मोठी कुंडी घेऊ नका. लहान कुंडी वापरा. मातीमध्ये 50 टक्के साधी माती आणि 50 टक्के गांडूळ खत किंवा शेणखत मिसळा. कुंडीच्या तळाला पाणी बाहेर जाण्यासाठी छिद्र असणे गरजेचे आहे.
चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी. मनी प्लांटला रोज पाणी लागत नाही. माती पूर्ण सुकल्यावरच पाणी द्या. रोज पाणी दिल्याने मुळे सडतात आणि हीच सर्वात मोठी चूक लोक करतात. उन्हाळ्यात 2 दिवसातून एकदा आणि हिवाळ्यात 4 दिवसातून एकदा पाणी पुरेसे आहे.
पाचवी गोष्ट म्हणजे जागा. मनी प्लांटला थेट कडक ऊन आवडत नाही. त्याला उजेड हवा असतो पण सावलीतला उजेड. त्यामुळे खिडकीजवळ, जिथे सकाळचे कोवळे ऊन येईल अशा ठिकाणी ठेवा. दुपारच्या कडक उन्हात ठेवले तर पाने जळून जातात.
जर तुमच्या मनी प्लांटची पाने पिवळी पडत असतील तर समजा तुम्ही पाणी जास्त देत आहात. जर पानांच्या कडा तपकिरी होत असतील तर पाणी कमी पडत आहे. हे लक्षात ठेवून पाण्याचे नियोजन करा. ही छोटी पद्धत लक्षात ठेवली तर तुमचा मनी प्लांट कधीही सुकणार नाही आणि घरात हिरवागार राहील.