व्यक्तिविशेष : भारताच्या क्रीडा इतिहासात काही नावे अशी आहेत जी पिढ्यांना प्रेरणा देतात. त्यातले एक नाव म्हणजे नीरज चोप्रा. भालाफेक हा खेळ भारतात फारसा कुणी पाहतही नव्हता, त्या खेळाला घराघरात पोहोचवणारा, ऑलिम्पिकमध्ये भारताला अॅथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा हरियाणाचा पोरगा म्हणजे नीरज.
नीरज चोप्राचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खांद्रा या छोट्याशा गावात झाला. तो रोर मराठा समाजातून येतो. त्याचे कुटुंब शेती करणारे साधे कुटुंब आहे. वडील सतीश कुमार शेतकरी आहेत आणि आई सरोज देवी गृहिणी आहेत. नीरज हा घरातील मोठा मुलगा असून त्याला दोन लहान बहिणी आहेत, संगीता आणि सरिता. काही रिपोर्ट्सनुसार त्याच्या लग्नाची चर्चा आहे, 2025 मध्ये टेनिसपटू हिमानी मोर हिच्याशी त्याने लग्न केल्याचे सांगितले जाते, मात्र नीरजने स्वतः यावर फार भाष्य केलेले नाही.
लहानपणी नीरज थोडा जाड होता. त्याचे वजन वाढले म्हणून वडिलांनी त्याला फिटनेससाठी पानिपतच्या शिवाजी स्टेडियममध्ये जिममध्ये टाकले. तिथेच त्याने पहिल्यांदा काही मुलांना भाला फेकताना पाहिले. हा खेळ त्याला आवडला आणि वयाच्या अवघ्या 11-12 व्या वर्षी त्याने भाला हातात घेतला.
नीरजचे प्राथमिक शिक्षण गावातील सरकारी शाळेत आणि बीव्हीएन पब्लिक स्कूल पानिपत येथे झाले. नंतर त्याने चंदीगडमधील डीएव्ही कॉलेजमधून पदवी घेतली. सध्या तो जालंधरमधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून बीएचे शिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच त्याला अभ्यास आणि खेळ याचा समतोल साधावा लागला, कारण घरापासून चार तास लांब असलेल्या पंचकुला येथील ताऊ देवी लाल स्टेडियममध्ये तो सरावासाठी जायचा.
नीरजचा पहिला कोच जयवीर चौधरी होता. त्यानंतर नसीम अहमद, गॅरी कॅल्वर्ट, उवे होन आणि सध्या चेक प्रजासत्ताकचे दिग्गज भालाफेकपटू यान झेलेझनी हे त्याचे कोच आहेत. 2012 मध्ये राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेत 68.46 मीटर भाला फेकून त्याने राष्ट्रीय विक्रम केला. खरा ब्रेकथ्रू मिळाला 2016 साली. साउथ एशियन गेम्समध्ये 82.23 मीटरसह सुवर्णपदक आणि त्याच वर्षी पोलंडमधील बायडगोश येथे वर्ल्ड अंडर 20 चॅम्पियनशिपमध्ये 86.48 मीटर फेकून ज्युनिअर वर्ल्ड रेकॉर्ड केला. तो आजही कायम आहे.
2017 मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण, 2018 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई गेम्स दोन्ही ठिकाणी सुवर्णपदक. आशियाई गेम्समधील 88.06 मीटरचा थ्रो त्यावेळी राष्ट्रीय विक्रम होता. त्याच्या कारकीर्दीत दुखापतीने मोठा अडथळा आणला. 2019 मध्ये कोपराला दुखापत झाल्यामुळे त्याला शस्त्रक्रिया करावी लागली आणि जवळपास एक वर्ष तो मैदानाबाहेर होता.
पण 7 ऑगस्ट 2021 हा दिवस भारत कधीच विसरणार नाही. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने 87.58 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. यानंतर त्याने 2022 मध्ये डायमंड लीग फायनल जिंकली, 2023 मध्ये बुडापेस्ट येथे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून वर्ल्ड चॅम्पियन बनला, 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याने रौप्य पदक जिंकले आणि 2025 मध्ये त्याने 90.23 मीटरचा वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो करत 90 मीटर क्लबमध्ये प्रवेश केला.
नीरजच्या यशात भारतीय लष्कराचा मोठा वाटा आहे. 2016 मध्ये त्याला राजपुताना रायफल्समध्ये नायब सुभेदार म्हणून नियुक्ती मिळाली. नंतर त्याला सुभेदार मेजर पद मिळाले. लष्कराने त्याला जागतिक दर्जाच्या सुविधा आणि पाठिंबा दिला.
नीरजची प्रेरणा ही फक्त पदके नाहीत. तो नेहमी सांगतो की मी गावातून आलो आहे, माझ्याकडे काहीच सुविधा नव्हत्या, पण कुटुंबाने मला कधीच अडवले नाही. पहिला भाला त्याने 7 हजार रुपयांना विकत घेतला होता, नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तो एक लाखाचा भाला वापरू लागला.
आज हरियाणाच्या खेड्यातील अनेक मुले भाला हातात घेत आहेत, त्याचे कारण फक्त नीरज आहे. त्याने दाखवून दिले की शेतकऱ्याचा मुलगा देखील ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवू शकतो. जिद्द, शिस्त आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल तर कुठलेही शिखर गाठता येते हेच त्याच्या आयुष्यातून शिकायला मिळते.
माहिती स्रोत : इंटरनेट