अहिल्यानगर : पुण्याजवळ एक अशी जागा आहे जिथे गेल्यावर तुम्हाला वाटेल तुम्ही चंद्रावर आला आहात. अहिल्यानगर जिल्ह्यातील निघोज गावातील कुकडी नदीच्या पात्रात तयार झालेले रांजणखळगे हा आशिया खंडातील सर्वात मोठा नैसर्गिक रांजणखळग्यांचा पट्टा मानला जातो. याला गिनीज बुकमध्येही नोंद मिळाली आहे असे सांगितले जाते.
ही मानवनिर्मित गोष्ट नाही, हा निसर्गाचा हजारो वर्षांचा खेळ आहे. भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मते पूर्वी या भागात खूप जास्त पाऊस पडायचा. कुकडी नदी ही भीमा नदीची उपनदी आहे आणि ती सह्याद्रीच्या डोंगरातून वेगाने वाहत यायची. नदीच्या पाण्यासोबत लहान दगड-गोटे यायचे. हे गोटे बेसाल्ट खडकाच्या भेगांमध्ये अडकायचे आणि पाण्याच्या गोलाकार प्रवाहामुळे वर्षानुवर्षे त्याच जागी घासत राहायचे. हळूहळू तिथे गोलाकार खड्डे तयार झाले. यालाच रांजणखळगे किंवा जिओलॉजीच्या भाषेत जायंट्स केटल असे म्हणतात. यातील काही खळग्यांची खोली 100 फुटांपेक्षा जास्त आहे.
हा एक दोन खळग्यांचा विषय नाही. निघोज येथे सुमारे 200 मीटर लांब आणि 60 मीटर रुंद परिसरात शेकडो लहान-मोठी खळगी पसरली आहेत. हा पूर्ण पट्टा जवळपास 3 किलोमीटरपर्यंत पसरला आहे असे मानले जाते. काही खळगे इतके मोठे आहेत की त्यात एक माणूस सहज उभा राहू शकतो. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे कडक उन्हाळ्यातही या खळग्यांमधले पाणी कधीच आटत नाही. प्रत्येक खळग्यात वेगळ्या प्रकारचे शेवाळ आणि जीव जंतू सापडतात, असे संशोधक सांगतात. नदीकाठीच कुंडमाऊली मळगंगा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे, त्यामुळे या खळग्यांना देवीने आंघोळीसाठी तयार केलेले कुंड असेही स्थानिक मानतात.
अंतर - पुण्यापासून निघोज 90 ते 95 किलोमीटर आहे. पारनेर तालुक्यात येते.
बाईक किंवा कारने - हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. पुणे - नगर हायवेने शिक्रापूर - शिरूर - रांजणगाव गणपती. रांजणगावपासून 25 किमी आत निघोज आहे. शिक्रापूर पासून निघोज 40 किमी. रस्ता थोडा अरुंद आहे पण चांगला आहे. स्वतःच्या गाडीने दीड ते दोन तासात पोहोचता येते.
एसटी बसने - पुण्यातील शिवाजीनगर एसटी स्टँडवरून पारनेर किंवा अळकुटीकडे जाणारी बस पकडा. निघोज फाट्यावर उतरून तिथून रिक्षा मिळते. थेट बस कमी आहेत, त्यामुळे रांजणगावपर्यंत जाऊन तिथून रिक्षा करणे सोपे पडते.
ट्रेन नाही, जवळचे रेल्वे स्टेशन अहिल्यानगर किंवा पुणे हेच आहे.
जाण्यासाठी बेस्ट टाईम म्हणजे सप्टेंबर ते फेब्रुवारी. पावसाळ्यानंतर कुकडी नदीला पाणी असते आणि खळगे पाण्याने भरलेले दिसतात, फोटो एकदम भारी येतात. उन्हाळ्यात खडक खूप तापतात, चपला घालूनच जा. तिथे हॉटेल किंवा मोठी सुविधा नाही, त्यामुळे पाणी आणि खाणे सोबत ठेवा. खळग्यांच्या काठावर खूप निसरडे होते, सेल्फीच्या नादात खाली उतरू नका. खोल खळग्यात पडल्यास बाहेर निघणे अवघड आहे.
निघोजपासून 25 किमीवर रांजणगावचे अष्टविनायक मंदिर आहे. 40 किमीवर मोराची चिंचोली आहे. त्यामुळे सकाळी निघून दुपारपर्यंत निघोज, संध्याकाळी चिंचोली असा एक दिवसाचा प्लॅन एकदम परफेक्ट होतो.