कृषी विभागाची मोठी घोषणा : 9 पिकांसाठी राज्यस्तरीय पीकस्पर्धा, विजेत्यांना 50 हजारांपर्यंतचे बक्षीस - टॉप न्यूज मराठी

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पिकांची उत्पादकता वाढवावी आणि प्रगतशील शेतीला चालना मिळावी यासाठी कृषी विभागाने सन 2026-27 साठी राज्यांतर्गत पीकस्पर्धा जाहीर केली आहे. यंदा खरीप हंगामातील 9 महत्वाच्या पिकांसाठी ही स्पर्धा घेतली जाणार आहे. यामध्ये अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य या तिन्ही प्रकारच्या पिकांचा समावेश आहे.

स्पर्धेसाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांची निवड करण्यात आली आहे. या पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2026 पर्यंत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

ही स्पर्धा सर्वसाधारण आणि आदिवासी अशा दोन्ही गटांसाठी आयोजित करण्यात आली आहे. प्रथम तालुका स्तरावर स्पर्धा होईल. त्यानंतर तालुक्यातून निवड झालेल्या शेतकऱ्यांची उत्पादकता जिल्हा आणि राज्य स्तरासाठी आधारभूत धरली जाईल. अशा प्रकारे तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर विजेत्या शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.

पीकस्पर्धेत सहभागी होणाऱ्या आणि उत्तम उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. तालुका स्तरावर प्रथम क्रमांकासाठी 5 हजार, द्वितीयसाठी 3 हजार आणि तृतीयसाठी 2 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 10 हजार, 7 हजार आणि 5 हजार रुपयांची बक्षिसे आहेत. तर राज्य स्तरावर सर्वात मोठे बक्षीस असून प्रथम क्रमांकासाठी 50 हजार, द्वितीयसाठी 40 हजार आणि तृतीय क्रमांकासाठी 30 हजार रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे.

पीकस्पर्धेत सहभागी होण्याची प्रक्रिया आणि इतर सर्व सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी असे कृषी विभागाने कळवले आहे. या स्पर्धेद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच यशस्वी शेतकऱ्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांसमोर ठेवून राज्यात कृषी उत्पादनात वाढ करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.