तव्यावरून काढलेली गरम पोळी, कढईतून काढलेला धगधगता समोसा आणि वाफ निघणारा गरम चहा पीण्याची आपल्यापैकी अनेकांना सवय असते. पदार्थ गरम असेल तरच त्याची खरी मजा येते असे अनेकजण म्हणतात. पण हीच सवय तुम्हाला गंभीर आजाराच्या दारात नेऊ शकते. एका मोठ्या आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आले आहे की अति गरम पदार्थ आणि पेये वारंवार खाल्ल्याने अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोका तीन पटीने वाढू शकतो.
या अभ्यासात यूकेमधील 9 लाख 77 हजार 282 प्रौढ लोकांच्या आरोग्य डेटाचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये संशोधकांना असे आढळले की ज्यांना खूप जास्त गरम चहा किंवा कॉफी पिण्याची सवय होती, त्यांना oesophageal squamous cell carcinoma नावाच्या अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोका सर्वात जास्त होता. जे लोक दिवसातून 6 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा अतिशय गरम पेये पितात, त्यांच्यामध्ये हा धोका कोमट पेये पिणाऱ्यांपेक्षा तिप्पट जास्त असल्याचे दिसून आले. याचा अर्थ चहाने कॅन्सर होतो असा नाही, तर चहाच्या तापमानाने धोका वाढतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
65 डिग्रीपेक्षा जास्त गरम पेये धोकादायक का आहेत, जागतिक आरोग्य संघटनेची संस्था IARC ने 65 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असलेल्या पेयांना probably carcinogenic म्हणजे कॅन्सर होण्याची शक्यता असलेल्या गटात टाकले आहे. कारण सतत अति गरम पदार्थ खाल्ल्याने आपल्या अन्ननलिकेच्या आतल्या नाजूक त्वचेला चटका बसतो. ती जखम भरून येण्यासाठी शरीराला पुन्हा नव्या पेशी तयार कराव्या लागतात. ही प्रक्रिया रोजच घडत राहिली तर पेशींमध्ये बदल होऊन कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.
पहिला पदार्थ आहे तव्यावरची पोळी आणि पराठा. अनेकांना तव्यावरून थेट ताटात गरम पोळी हवी असते. पण तोंडाला चटका बसेल इतकी गरम पोळी खाऊ नका. 2 मिनिटे थंड होऊ द्या.
दुसरा पदार्थ आहे समोसा आणि कचोरी. बाहेरून थंड वाटणारा समोसा आतून प्रचंड गरम असतो. आतला बटाटा किंवा डाळीचे सारण तोंडाला आणि घशाला भाजू शकते. नेहमी समोसा फोडून वाफ जाऊ द्या आणि मग खा.
तिसरा पदार्थ आहे डाळ, सांबार आणि आमटी. गॅसवरून उतरवून लगेच प्यायल्याने घशाला इजा होते. थोडे कोमट झाल्यावरच प्या.
चौथा पदार्थ आहे गरम सूप आणि रसम. वरून थंड दिसणारे सूप आतून उकळत असते. त्यामुळे पहिला घोट नेहमी छोटा घेऊन तापमान तपासा.
पाचवा पदार्थ आहे इडली, ढोकळा. वाफेवर बनलेले असल्याने हे पदार्थ आतपर्यंत खूप गरम असतात. कुकरमधून काढल्यावर 3 ते 4 मिनिटे थांबून मगच खा.
उपाय अगदी सोपा आहे. कोणताही पदार्थ खाण्यापूर्वी किंवा चहा पिण्यापूर्वी 2 ते 3 मिनिटे थांबा. घाईत खाऊ नका. कोमट पदार्थ खा, अति गरम नाही. ही छोटी सवय तुम्हाला मोठ्या आजारापासून वाचवू शकते.