मोशी कचरा डेपो दुर्घटना : दुर्घटनेतील एकूण मृतांची संख्या 9 वर; शोधमोहीम पूर्ण झाल्याने बचावकार्य थांबविण्यात आले - टॉप न्यूज मराठी

मोशी कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेत चौथ्या दिवशीच्या शोधमोहीमेत दुर्घटनाग्रस्त इमारतीत अडकलेल्या ७ नागरिकांच्या मृत्यूसह इमारतीशेजारील ढिगाऱ्याखाली मध्यरात्री १ वाजता आढळून आलेल्या वामन कसबे (वय ५०, मोशी) या नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या ९ इतकी झाली असून या दुर्घटनेतील सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्याने बचावकार्य थांबविण्यात आले आहे.

८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास मोशी कचरा डेपो येथे इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीत व इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, भारतीय सेना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. घटना घडल्यानंतर लागलीच पाच नागरिक स्वतः बाहेर आले होते. उर्वरित १८ नागरिकांपैकी ९ नागरिकांना दुर्घटनाग्रस्त इमारतीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. तब्बल ८४ तास अविरत चाललेल्या या बचावमोहीमेतील शोधकार्यामध्ये चौथ्या दिवशी इमारतीत अडकलेल्या ७ आणि इमारतीशेजारील ढिगाऱ्यात अडकलेल्या १ अशा ८ व्यक्तींचा मृत्यू झाला. तर इमारतीत अडकलेल्या भावेश वाणी यांचा ९ जुलै रोजी मृत्यू झाला होता. बचावकार्याच्या चौथ्या दिवशी अक्षय सावंत (वय ३५, मोशी), सुनील कोरके (वय ४०, आळंदी), सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय २२, मोशी) तसेच राहुल गायकवाड (वय ३४, मोशी) यांचा मृत्यू झाला.

एक नागरिक इमारतीशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकून पडल्याने त्याठिकाणी निरंतर शोधमोहीम सुरू होती. अखेर चौथ्या दिवशी मध्यरात्री १ वाजता वामन कसबे (वय ५०, मोशी) यांचा शोध लागला. त्यांना तातडीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तपासणीअंती त्यांना मृत घोषित करण्यात आले.

संपूर्ण बचावकार्यादरम्यान आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून होते. दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये सुरक्षित प्रवेश करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत इमारतीच्या बाजूचा कचऱ्याचा ढीग वेगाने हटविल्यानंतर या इमारतीत प्रवेश करण्याचे सर्व बाजूंनी प्रयत्न करण्यात आले. इमारत अस्थिर असल्याने ती पूर्ण कोसळून आत अडकलेल्या जीवितांना धोका पोहोचू नये, याची काळजी घेऊन बचावकार्य राबविण्यात येत होते. इमारतीचा वरचा मजला हटविण्यासाठी दोन अत्याधुनिक डिमोलिशन एक्सकॅव्हेटर यंत्रे मागविण्यात आली. या यंत्रांच्या सहाय्याने इमारतीच्या वरच्या मजल्याचे काँक्रीट फोडून आत जाण्याचा मार्ग तयार करण्यात आला. चौथ्या दिवशी दुपारी २ वाजता इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात झाली. रात्री १० वाजेपर्यंत अडकलेल्या सर्व आठही नागरिकांना बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने या सर्वांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, इमारतीशेजारील ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकाचा शोध घेण्यासाठी सर्चिंग ऑपरेशन निरंतर सुरू होते. यासाठी एनडीआरएफच्या श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली. अखेर मध्यरात्री १ वाजता वामन कसबे यांचा शोध लागला. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील एकूण मृतांची संख्या ९ इतकी झाली आहे. या दुर्घटनेत अडकलेल्या सर्व नागरिकांचे शोधकार्य पूर्ण झाल्याने अखंडपणे तब्बल ८४ तास चाललेली ही बचावमोहीम मध्यरात्री २ वाजता थांबविण्यात आली