पुणे व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी फतेचंद रांका, सचिवपदी महेंद्र पितळीया यांची बिनविरोध निवड, 82 संघटनांचे नेतृत्व करणार - टॉप न्यूज मराठी

पुणे: पुणे शहरातील 82 व्यापारी संघटनांची शिखर संघटना असलेल्या पुणे व्यापारी महासंघाची त्रैवार्षिक निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सन 2026 ते 2029 या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी फतेचंद रांका आणि सचिवपदी महेंद्र पितळीया यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅडव्होकेट देवीदास साळी यांनी काम पाहिले. एकूण 10 पदाधिकारी आणि 12 कार्यकारिणी सदस्य अशी 22 सदस्यांची निवड करण्यात आली.

उपाध्यक्षपदी सूर्यकांत पाठक, सुरेखा सांडभोर बोऱ्हाडे आणि नितीन काकडे यांची निवड झाली. सुरेखा सांडभोर यांच्या रूपाने महासंघाला प्रथमच महिला उपाध्यक्ष लाभल्या आहेत. सहसचिवपदी यशस्वी पटेल, राहुल हजारे आणि कुमार भोगशेट्टी यांची निवड झाली. खजिनदारपदी प्रमोद शहा तर सहखजिनदारपदी मोहन पटेल यांची निवड करण्यात आली.

फतेचंद रांका हे रांका ज्वेलर्स प्रा. लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. ते पुणे सराफ असोसिएशनचे गेली 37 वर्षे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन, जैन गोडवाड संघ, लायन्स क्लब ऑफ पुना सारसबागचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. व्यवसायवृद्धी, नेतृत्व, टीम व्यवस्थापन यासाठी ते उत्तम वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. महेंद्र पितळीया हे ज्येष्ठ औषध व्यवसायिक असून उत्तम संघटन कौशल्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत.

सूर्यकांत पाठक हे ग्राहक पेठेचे संचालक आहेत. नितीन काकडे हे पुणे स्टेनलेस स्टील मर्चंट्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. सुरेखा सांडभोर या पुना मशिनरी मर्चंट्स असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत. कार्यकारिणी सदस्य म्हणून अॅड. अजिंक्य उडाणे, अजित सांगळे, जयंतीलाल जैन, जयंतीलाल ओसवाल, मनीष परदेशी, प्रमोद चव्हाण, प्रितम शिंदे, रोहित यवतकर, उमेश झंवर, वैभव लोढा, विजय शहा, वीरमीत मैनी यांची निवड झाली. स्वीकृत सदस्य म्हणून मिलिंद शालगर, विनोद अहिर, महेश खोपडे, नरेंद्र शहा, शंकर पटेल, रवि शर्मा यांची निवड करण्यात आली.

पुणे व्यापारी महासंघाची स्थापना 1994 साली झाली आहे. महासंघाने सेल्स टॅक्स, व्हॅट आणि एल.बी.टी. च्या जाचक कायद्याविरोधात यशस्वी लढा दिला आहे. जीएसटी कायदे समजून घेण्यासाठी व्यापाऱ्यांचे अनेक मार्गदर्शन मेळावे घेतले. कोरोना काळात व्यापाऱ्यांची भूमिका शासनासमोर खंबीरपणे मांडली. व्यापारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण शिबिरे घेतली.

निवडीनंतर बोलताना अध्यक्ष फतेचंद रांका म्हणाले, सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन व्यवसाय करणे ही काळाची गरज आहे. व्यवसाय वाढीसाठी अनेक कार्यशाळा आयोजित करून पुणे शहराला व्यापाराचे प्रमुख केंद्र बनवण्याचा आमचा मानस आहे. सचिव महेंद्र पितळीया म्हणाले, व्यापाऱ्यांनी व्यवसायात नवनवीन कल्पना आत्मसात केल्या पाहिजेत. नावीन्यपूर्ण कल्पना केवळ उलाढाल वाढवत नाहीत, तर ग्राहकांचा विश्वासही घट्ट करतात. उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक म्हणाले, महासंघ व्यापाऱ्यांच्या हक्कांसाठी नेहमीच लढत राहील, त्यासाठी सर्वांनी एकजूट राहणे आवश्यक आहे. यावेळी विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेखा सांडभोर यांनी आभार मानले. सभेची सांगता राष्ट्रगीताने झाली.