रंजक रोचक : आपण बाजारात 20 ते 100 रुपये किलोने भाजी घेतो, पण जगात एक अशी भाजी आहे जिची किंमत सोन्यापेक्षाही जास्त वाटेल. या भाजीचा एक किलोचा दर 80 हजार ते 1 लाख रुपये आहे. या भाजीचे नाव आहे हॉप शूट्स.
हॉप शूट्स काय आहे. हॉप हे एका वनस्पतीचे कोवळे कोंब आहेत. या वनस्पतीचा उपयोग प्रामुख्याने बिअर बनवण्यासाठी होतो, पण याचे कोवळे कोंब भाजी म्हणून खाल्ले जातात. दिसायला हे कोंब अगदी लहान आणि हिरव्या रंगाचे असतात. याची चव थोडी कडवट आणि चटपटीत असते.
इतकी महाग का आहे. या भाजीची लागवड करणे खूप अवघड आहे. हॉपच्या रोपापासून खूप कमी प्रमाणात कोंब निघतात. हे कोंब हाताने एक करून तोडावे लागतात, यंत्राने तोडता येत नाहीत. तसेच हे कोंब फक्त वसंत ऋतूमध्ये काही आठवड्यांसाठीच येतात. त्यामुळे याचे उत्पादन खूप कमी होते आणि मागणी जास्त असते. याशिवाय या भाजीमध्ये औषधी गुणधर्म असल्याने युरोपमध्ये याला खूप मागणी आहे.
आरोग्यासाठी फायदे काय. हॉप शूट्समध्ये अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. यात असे घटक असतात जे चिंता आणि निद्रानाश कमी करण्यास मदत करतात. तसेच पचन सुधारण्यासाठी आणि त्वचेसाठीही ही भाजी फायदेशीर मानली जाते.
भारतात लागवड होते का. हो, या भाजीची लागवड भारतातही सुरू झाली आहे. बिहारमधील एका शेतकऱ्याने याची लागवड करून चर्चेत आला होता. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या थंड प्रदेशात याची लागवड चांगली होते. भारतात याची किंमत परदेशापेक्षा कमी म्हणजे 2 ते 3 हजार रुपये किलो आहे, पण आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 80 हजार रुपयांपर्यंत जाते.
ही भाजी सामान्य माणसाच्या ताटात रोज येत नाही, पण पंचतारांकित हॉटेल्स आणि युरोपमधील मोठ्या रेस्टॉरंटमध्ये या भाजीपासून खास पदार्थ बनवले जातात. त्यामुळे या भाजीला हिरवे सोने असेही म्हटले जाते.