आरोग्य : हिवाळा सुरू झाला की थंडी वाढते आणि शरीराला जास्त ऊर्जा लागते. या काळात सर्दी, खोकला, सांधेदुखी आणि थकवा यासारखे त्रास वाढतात. त्यामुळे हिवाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य पदार्थ खाल्ले तर शरीर गरम राहते आणि आजारांपासूनही संरक्षण मिळते.
हिवाळ्यात गूळ आणि तीळ आवर्जून खावेत. तीळाच्या लाडूमुळे शरीराला उष्णता मिळते. तीळात कॅल्शियम आणि चांगले फॅट्स असतात. त्यामुळे हाडे मजबूत होतात.
बदाम, अक्रोड, मनुका, काजू यासारखा सुका मेवा हिवाळ्यात खूप फायदेशीर असतो. यातून जीवनसत्त्वे आणि पोषक घटक मिळतात. रोज सकाळी भिजवलेले बदाम खाल्ले तर मेंदूला चांगले असते.
हिरव्या पालेभाज्या हिवाळ्यात मुबलक मिळतात. मेथी, पालक, शेपू, हरभऱ्याची भाजी यातून लोह आणि फायबर मिळते. यामुळे रक्ताची कमतरता दूर होते आणि पचनही सुधारते.
गाजर आणि बीट हिवाळ्यातील उत्तम भाज्या आहेत. गाजर डोळ्यांसाठी चांगले असते. बीटामुळे रक्त वाढते. यांचे सॅलड किंवा ज्यूस घेतल्यास शरीराला फायदा होतो.
मूग डाळ, हरभरा, मटकी यासारखी कडधान्ये प्रथिनांसाठी उत्तम आहेत. यामुळे शरीराची ताकद टिकून राहते. हिवाळ्यात खिचडी, उसळ यांचा आहारात समावेश करावा.
आवळा हा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आवळ्याचे चूर्ण, मुरब्बा किंवा ज्यूस घेता येतो.
थंडीत गरम भाज्यांचे सूप प्यायल्याने शरीराला उब मिळते. यातून पाणी आणि पोषण दोन्ही मिळते. दूध आणि दही यातून कॅल्शियम आणि प्रथिने मिळतात. रात्री हळदीचे दूध प्यायल्यास झोपही चांगली लागते.
हिवाळ्यात तहान कमी लागते म्हणून अनेकजण पाणी कमी पितात. पण पाणी पुरेसे पिणे गरजेचे आहे. योग्य आहार, रोज थोडा व्यायाम आणि पुरेशी झोप घेतली तर हिवाळा आजारांशिवाय आनंदात जाईल.