पुणे : मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेली संधी आता 8 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवली आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण म्हणजेच SIR या कार्यक्रमांतर्गत सर्व मतदारांना एन्युमरेशन फॉर्म भरायचा आहे. पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघ क्रमांक 214 मधील सर्व पात्र मतदारांनी ही मुदत लक्षात घेऊन तातडीने फॉर्म भरावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी केले आहे.
ही मतदार यादीची तपासणी आहे. तुमचे नाव, पत्ता आणि इतर माहिती बरोबर आहे का हे तपासण्यासाठी हा फॉर्म भरायचा असतो. यामुळे चुकीची नावे कमी होतात आणि नवीन पात्र मतदारांची नावे यादीत येतात.
1. ऑनलाइन : voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन घरी बसून फॉर्म भरू शकता.
2. ऑफलाइन : तुमच्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO यांच्याकडे जाऊन फॉर्म भरून देऊ शकता.
फॉर्म भरताना काही अडचण आल्यास किंवा काही माहिती हवी असल्यास थेट आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क करा.
ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. 8 ऑगस्टपर्यंत जर तुम्ही एन्युमरेशन फॉर्म भरला नाही, तर तुमचे नाव येणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होणार नाही. त्यामुळे पुढील निवडणुकीत तुम्हाला मतदान करता येणार नाही. मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी पुन्हा एकदा सर्व मतदारांना विनंती केली आहे की, आपल्या मताचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण प्रक्रियेत सहभागी व्हा आणि वेळेत फॉर्म सादर करा.