विदेश : पनामा हादरला, 7.6 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, त्सुनामीचा इशारा जारी - टॉप न्यूज मराठी

विदेश : मध्य अमेरिकेतील पनामा देशात आज सकाळी निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळाला. काही तासांच्या अंतरात दोन शक्तिशाली भूकंपांनी संपूर्ण देश हादरून गेला आहे.

अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षणानुसार पहिला भूकंप सकाळी 7.6 रिश्टर स्केलचा होता. हा भूकंप इतका मोठा होता की त्याचा धक्का जवळच्या कोस्टा रिका आणि कोलंबिया देशातही जाणवला. या भूकंपानंतर काही वेळातच 6.5 रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप झाला. त्यानंतर अनेक छोटे मोठे धक्के बसतच आहेत.

या भूकंपामुळे किनारपट्टीच्या भागात भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून काही भागात त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. समुद्र किनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. अनेक शाळा, ऑफिस आणि सरकारी इमारती तातडीने रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

अद्याप जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान किती झाले याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण सोशल मीडियावर येणाऱ्या व्हिडिओमध्ये रस्त्यांना भेगा पडलेल्या दिसत आहेत आणि अनेक घरांच्या भिंती कोसळल्या आहेत.

पनामा हा देश दोन मोठ्या समुद्रांच्या मध्ये आहे आणि तो भूकंप प्रवण क्षेत्रात येतो. त्यामुळे तिथे नेहमीच भूकंपाचा धोका असतो. पण आजचा भूकंप हा गेल्या काही वर्षातील सर्वात मोठा मानला जात आहे. प्रशासनाने लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.