मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात, नर्मदा नदीच्या मधोमध असलेल्या मान्धाता पर्वतावर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग वसले आहे. हे बेट नर्मदा नदीतून पाहिल्यास साक्षात ॐ च्या आकाराचे दिसते, म्हणून याचे नाव ओंकारेश्वर पडले आहे. येथे दोन ज्योतिर्लिंग आहेत - एक ओंकारेश्वर आणि दुसरे नदीच्या दुसऱ्या काठावर असलेले ममलेश्वर (अमलेश्वर). दोन्हीचे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण मानली जात नाही.
पुराणकथेनुसार, विंध्य पर्वताने भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली. प्रसन्न होऊन शिवाने त्याला दोन रूपात दर्शन दिले - एक ओंकारेश्वर आणि दुसरे ममलेश्वर. दुसऱ्या कथेनुसार राजा मान्धाताने येथे तप करून शिवाला प्रसन्न केले होते. हे स्थान मोक्षदायी मानले जाते.
पुणे ते ओंकारेश्वर अंतर सुमारे 700 ते 750 किमी आहे.
1. ट्रेनने: पुण्यातून थेट ओंकारेश्वरला ट्रेन नाही. पुण्यातून इंदूरला (ट्रेन नं 22944) जावे लागेल. इंदूरपासून ओंकारेश्वर फक्त 77 किमी आहे. इंदूरहून बस किंवा टॅक्सी सहज मिळते.
2. विमानाने: सर्वात जवळचे विमानतळ इंदूर (77 किमी) आहे.
3. कार / बसने: पुणे - नगर - शिर्डी - धुळे - इंदूर मार्गे 13-14 तासांचा प्रवास.
मंदिर सकाळी 5 ते रात्री 10:30 पर्यंत उघडे असते.
सामान्य दर्शन मोफत आहे, पण गर्दी 3 ते 5 तासांची असते. श्रावणात गर्दी जास्त असते म्हणून ऑनलाईन VIP पास घेणे उत्तम. ऑनलाईन पासची किंमत Rs 300 आहे आणि याने 15-20 मिनिटात दर्शन होते. बुकिंगसाठी अधिकृत वेबसाईट आहे - shriomkareshwar.org. प्रसाद किंवा हार-फुले आत घेऊन जाऊ देत नाहीत. नर्मदा पार करण्यासाठी झुलता पूल आहे किंवा 20 रुपयांत बोटीनेही जाता येते.