पुणे (मुळशी): सोशल मीडियावरील भूलथापा आणि भोंदूगिरी किती जीवघेणी ठरू शकते, याचा धक्कादायक प्रत्यय पुणे ग्रामीणमधील पौड परिसरात आला आहे. इन्स्टाग्रामवर "जुने प्रेम परत मिळवून देतो" असे आमिष दाखवून एका २५ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीची फसवणूक करणाऱ्या आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या राजस्थानच्या टोळीला पौड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
कोळवण (ता. मुळशी) येथील चिन्मय विभूती आश्रमात राहून बासरी वादनात एम.ए. पदवीचा अभ्यास करणारी रेणुका लिखिते हिने ६ एप्रिल रोजी आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अभ्यासात हुशार असलेल्या मुलीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली.
इन्स्टाग्रामवरून जाळ्यात ओढले
तपासादरम्यान पोलिसांना आढळले की, इन्स्टाग्रामवरील एका टोळीने रेणुकाला गाठले होते. "आम्ही तुमचे जुने प्रेम परत मिळवून देऊ, त्यासाठी स्मशानात पूजा करावी लागेल," असे सांगून आरोपींनी तिच्याकडून गुगल पे द्वारे ७४ हजार रुपये उकळले. त्यानंतर अधिक पैशांसाठी आरोपींनी तिला धमकी देण्यास सुरुवात केली. "पैसे दिले नाहीस तर तुझ्या आई-वडिलांचे आणि प्रियकराचे काहीतरी वाईट होईल," अशी भीती घातल्याने मानसिक दडपणाखाली येऊन रेणुकाने जीवनयात्रा संपवली
राजस्थानमधून आरोपींना ठोकल्या बेड्या
पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील 'नोखा' गावचे असल्याचे निष्पन्न झाले. पौड पोलिसांचे एक पथक तातडीने राजस्थानला रवाना झाले आणि तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने किशन ईश्वरचंद लखारा (२२) आणि सुनील रामेश्वर लाल भार्गव या दोघांना अटक केली.
पोलीस कोठडी आणि कारवाई
आरोपींना बिकानेर न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांडद्वारे पुण्यात आणण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना २ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीवर भारतीय न्याय संहिता (BNS), महाराष्ट्र जादूटोणा विरोधी अधिनियम आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पौड पोलिसांनी पार पाडली.