रंजक रोचक : 70 दिवस सूर्य मावळतच नाही, या देशात असतो कायम दिवसचं ! वाचा आश्चर्यकारक सत्य - टॉप न्यूज मराठी

रंजक रोचक : आपल्याकडे दररोज सकाळी सूर्य उगवतो आणि संध्याकाळी मावळतो, हा निसर्गाचा नियम आहे. पण तुम्हाला माहिती आहे का जगात एक असा देश आहे जिथे तब्बल 70 दिवस सूर्य मावळतच नाही. तिथे सतत दिवस असतो, रात्रीचा अंधारच येत नाही. हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे.

हा चमत्कार नॉर्वे या देशात पाहायला मिळतो. नॉर्वेला मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असेही म्हटले जाते. नॉर्वेच्या उत्तर भागात असलेल्या स्वालबार्ड या भागात मे महिन्याच्या मध्यापासून ते जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत सूर्य सतत आकाशात दिसतो. जवळपास 70 ते 76 दिवस सूर्य क्षितिजाच्या खाली जातच नाही. त्यामुळे तिथे रात्री 12 वाजता सुद्धा दिवसासारखा उजेड असतो.

यामागचे वैज्ञानिक कारण काय आहे तर पृथ्वी तिच्या अक्षावर 23.5 अंश कललेली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात उत्तर ध्रुव सूर्याकडे झुकलेला असतो. त्यामुळे आर्क्टिक सर्कलच्या वरच्या भागात सूर्याची किरणे सतत पडत राहतात. सूर्य गोल गोल फिरतो पण मावळत नाही. यालाच वैज्ञानिक भाषेत मिडनाईट सन असे म्हणतात.

नॉर्वे शिवाय स्वीडन, फिनलंड, आईसलँड आणि कॅनडा या देशांच्या काही भागातही हा प्रकार पाहायला मिळतो. पण नॉर्वेमध्ये याचा अनुभव सर्वात जास्त काळ घेता येतो. हॅमरफेस्ट आणि नॉर्डकॅप ही नॉर्वे मधील शहरे या दृश्यासाठी प्रसिद्ध आहेत.

तिथल्या लोकांचे जीवन कसे असते हा प्रश्न अनेकांना पडतो. 70 दिवस सतत उजेड असल्याने सुरुवातीला झोपेचे वेळापत्रक बिघडते. लोकं घराला गडद पडदे लावतात. डोळ्यावर पट्टी लावून झोपतात. पण हळूहळू त्यांना याची सवय होते. या काळात पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढते. जगभरातून लोकं मध्यरात्रीचा सूर्य पाहण्यासाठी नॉर्वेला जातात. तिथे मध्यरात्री गोल्फ खेळणे, ट्रेकिंग करणे, बोटिंग करणे असे अनुभव पर्यटक घेतात.

विशेष म्हणजे याच्या अगदी उलट हिवाळ्यात तिथे 2 महिने सूर्य उगवतच नाही. त्याला ध्रुवीय रात्र म्हणतात. सतत अंधार असतो. त्यामुळे नॉर्वे हा खरोखरच निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार असलेला देश आहे.