धक्कादायक : "बिहारच्या लखीसरायमध्ये मंदिराजवळ भीषण चेंगराचेंगरी ! 7 महिलांचा मृत्यू, 12 जखमी, अफवेमुळे पळापळ" - टॉप न्यूज मराठी

पटणा : बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील प्रसिद्ध अशोकधाम मंदिराजवळ शनिवारी सकाळी भीषण चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 7 महिलांचा मृत्यू झाला असून 12 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना अशोकधाम रेल्वे स्टेशन ते मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांची रांगा मंदिरापासून थेट स्टेशनपर्यंत लागली होती. पहाटेच्या सुमारास अचानक पुरुषांच्या रांगेवर एक विजेचा खांब कोसळला. त्यानंतर "लोकांवर जिवंत तार पडली" अशी अफवा क्षणार्धात पसरली. 

पण प्रत्यक्षात ती तार डिश किंवा इंटरनेटची केबल होती. या अफवेमुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट उडाली. जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळू लागले. याच गडबडीत बॅरिकेड्स तुटले आणि पुरुषांच्या गर्दीचा दाब महिलांच्या रांगेवर पडला. त्यात अनेक महिला खाली पडून एकमेकींच्या अंगाखाली चिरडल्या गेल्या. अवघ्या 2 मिनिटांत ही दुर्घटना घडली.

जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार यांनी सांगितले की, पोलीस आणि प्रशासन पहाटे 3 वाजल्यापासूनच बंदोबस्तासाठी होते. मृतांमध्ये मधुबाला देवी, मनमाला देवी, हेमलता देवी आणि मुंगेरच्या रिंकू देवी यांचा समावेश आहे. सर्व मृत महिला लखीसरायच्या रहिवासी आहेत.

मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींवर लखीसरायच्या सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे  यापूर्वी 31 मार्च रोजी नालंदा जिल्ह्यातील मघरा शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 9 भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यात 8 महिला होत्या.