मोठी बातमी : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! दिल्ली मुंबईसह 7 प्रमुख मार्ग होणार फोर लेन, मोदी कॅबिनेटचा मोठा निर्णय - टॉप न्यूज मराठी

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! केंद्र सरकारने आज रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. देशातील रेल्वे वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत करण्यासाठी मोदी कॅबिनेटने सात मोठ्या रेल्वे कॉरिडोरला फोर लेन करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात होणारी गर्दी आणि ट्रेन लेट होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

या सात प्रकल्पांमध्ये देशातील सर्वात व्यस्त असलेल्या दिल्ली ते मुंबई या मार्गाचाही समावेश आहे. दिल्ली मुंबई मार्गावर सर्वाधिक गर्दी असते त्यामुळे हा मार्ग फोर लेन झाल्यावर या रूटवर अधिक ट्रेन चालवता येणार आहेत. याशिवाय मुंबई ते चेन्नई, चेन्नई ते कोलकाता आणि कोलकाता ते दिल्ली हे गोल्डन क्वॉड्रिलॅटरलचे मार्ग देखील फोर लेन होणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हे सात हाय डेन्सिटी कॉरिडोअर देशातील एकूण रेल्वे ट्रॅफिकच्या 40 टक्के भार सांभाळतात.

यावर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की देशात 11 हजार किलोमीटरचे 7 हाय डेन्सिटी कॉरिडोअर आहेत. त्यांना फोर लेन बनवण्याचे काम सुरु आहे. यापैकी सुमारे 2 हजार किलोमीटरवर आधीच फोर लेनचे काम पूर्ण झाले आहे. 5 हजार किलोमीटरवर काम सुरु आहे आणि उर्वरित 4 हजार किलोमीटरसाठी अंतिम मंजुरी प्रक्रिया सुरु आहे. हे कॉरिडोअर पूर्ण झाल्यावर वाहतुकीचा ताण कमी होईल.

फोर लेन प्रकल्पासोबतच कॅबिनेटने इतर मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांनाही मंजुरी दिली आहे. पाच राज्यांमधील 14 जिल्ह्यांमध्ये 3 मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे रेल्वेचे नेटवर्क 656 किलोमीटरने वाढणार असून यासाठी 10 हजार 783 कोटी रुपये खर्च येणार आहे.

त्याचबरोबर तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या चार राज्यांमधील 17 जिल्ह्यांसाठी 5 नवीन मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे 540 किलोमीटरचे नवीन नेटवर्क तयार होईल आणि 10 हजार 21 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे सर्व प्रकल्प 2029-30 पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.