शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! राज्य सरकारकडून कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा, 6.22 लाख खात्यांवर 5029 कोटी - टॉप न्यूज मराठी

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. "अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना" अंतर्गत पहिल्या टप्प्यातील रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका क्लिकद्वारे ही प्रक्रिया पार पडली.

पहिल्या टप्प्यात कोणाला किती लाभ ? सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. 

- 6.22 लाख शेतकरी

- 5029 कोटी रुपये

- आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर ही रक्कम थेट वर्ग करण्यात आली आहे.

यामुळे लाखो शेतकऱ्यांची कर्जखाती आता 'निल' झाली आहेत. त्यांना सावकार आणि व्याजाच्या बोजातून मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले?

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "ही योजना पूर्णपणे सुलभ ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करावा लागला नाही. फक्त ग्रामपंचायतींना पाठवलेल्या यादीतील नावांसाठी आधार ऑथेंटिकेशन करणे आवश्यक होते. त्यानंतर थेट खाती निल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली."

त्यांनी पुढे सांगितले की, "बऱ्याच खात्यांवर एमपीएचे व्याज लागल्याने कर्जाची रक्कम जास्त दिसत होती. बँकांनी ते व्याज माफ केल्यामुळे आणि शासनाने भरलेली रक्कम यामुळे आता ती खाती पूर्णपणे निल झाली आहेत."

पुढील टप्पा आणि महत्त्वाचे निर्णय

1. दुसरा टप्पा लवकरच: पहिल्या यादीतील ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे, त्यांची प्रक्रिया पूर्ण होताच त्यांनाही टप्प्याटप्प्याने लाभ दिला जाणार आहे.

2. खरीप कर्जासाठी आदेश: कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश सर्व बँकांना देण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी आर्थिक अडचण येणार नाही.

3. चुका दुरुस्तीची प्रक्रिया: सुमारे 12 लाख कर्जखाती बँकांच्या तांत्रिक चुकांमुळे परत आली होती. ती खाती एका आठवड्यात दुरुस्त करून पुन्हा सादर करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. ती क्लिअर होताच त्यांनाही पैसे दिले जातील.

सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कर्जाच्या ओझ्यामुळे अडचणीत आलेल्या अनेक कुटुंबांना यामुळे नवा हातभार लागणार आहे.