मुंबईतील साकीनाकामध्ये भीषण आग, भंगार गोडाऊन जळून खाक, 60 हून अधिक दुकानांचे नुकसान, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी - टॉप न्यूज मराठी

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. खैराणी रोडवरील एका मोठ्या भंगार गोडाऊनला ही आग लागली असून काही वेळातच तिने रौद्ररूप धारण केले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या गोडाऊनमधून धुराचे लोट निघू लागले. भंगारामध्ये प्लास्टिक, रबर आणि इतर ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणात असल्याने आग वेगाने पसरली. या आगीत जवळपास 60 ते 70 लहान मोठी दुकाने आणि गोडाऊन जळून खाक झाली आहेत. या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई महानगरपालिकेने या भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे.

या आगीमुळे खैराणी रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य पसरले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी असून अधिक तपास सुरू आहे.