मुंबईला मिळणार 'सेंट्रल पार्क'ची भेट! 60 हजार झाडे, सायकल ट्रॅक आणि जागतिक दर्जाच्या सुविधांनी सजणार महालक्ष्मी रेसकोर्स - टॉप न्यूज मराठी

महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात सायकल ट्रॅक, ओपन जिम, मुलांसाठी खेळाची मैदाने आणि 60 हजार झाडांसह जागतिक दर्जाची हरित जागा विकसित करण्याची योजना.

मुंबईकरांसाठी लवकरच आणखी एका मोठ्या ग्रीन स्पेसची भेट मिळणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात तब्बल 295 एकरांवर 'मुंबई सेंट्रल पार्क' उभारण्याची योजना तयार करण्यात आली आहे. न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्क आणि लंडनच्या हायड पार्कच्या धर्तीवर विकसित होणारा हा प्रकल्प मुंबईच्या ओळखीमध्ये नवा अध्याय जोडणार आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, मुलांसाठी खेळाची मैदाने, वाचनासाठी खास जागा, बॉटनिकल गार्डन आणि ध्यानासाठी स्वतंत्र क्षेत्र असणार आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण परिसरात सुमारे 60 हजार झाडांची लागवड करण्यात येणार असून मुंबईला मोठे 'ग्रीन लंग' मिळणार आहे. यामुळे शहरातील हरित क्षेत्रात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

या प्रकल्पाचा आणखी एक खास भाग म्हणजे भूमिगत क्रीडा संकुल. येथे ऑलिम्पिक दर्जाच्या विविध क्रीडा सुविधा, धावपट्टी, जलतरण तलाव तसेच सुमारे पाच हजार वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडवरील खुल्या जागांना जोडण्यासाठी भूमिगत बोगदाही उभारण्यात येणार आहे.

मुंबईत दरडोई हरित क्षेत्राचे प्रमाण इतर महानगरांच्या तुलनेत कमी असल्याने हा प्रकल्प पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच जागतिक दर्जाचे, निसर्गाच्या सान्निध्यातील एक नवे पर्यटन आणि विरंगुळ्याचे ठिकाण मिळणार आहे.

#topnewsmarathi #mumbai #topnews #breakingnews