मुंबई : महाराष्ट्रातून मान्सूनने माघार घेताच मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज 9 ऑक्टोबर साठी मुंबईसह 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 9 ऑक्टोबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. या जिल्ह्यांमध्ये तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने उद्या 10 ऑक्टोबर साठी सुद्धा इशारा दिला आहे. उद्या ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा घाट आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असेल. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
नैऋत्य मान्सून परतल्यानंतर आर्द्रता वाढल्याने आणि आकाश निरभ्र झाल्याने उष्णता वाढत आहे. पावसाळ्यानंतरचा हा ऑक्टोबर हिट असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 11 आणि 12 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामान पुन्हा सामान्य होईल आणि सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट असेल असे IMD ने सांगितले आहे.
1. दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात जाणे टाळा.
2. भरपूर पाणी प्या, शरीरात पाणी कमी होऊ देऊ नका.
3. लहान मुले आणि वयोवृद्ध लोकांनी विशेष काळजी घ्यावी.
4. बाहेर जाताना टोपी किंवा छत्री वापरा.
मुंबईचा प्रमुख पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर धरणात केवळ 70% पाणीसाठा शिल्लक असल्याने 16 ऑक्टोबर पासून 10% पाणी कपात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेसोबतच पाणी कपातीचे संकट देखील मुंबईकरांसमोर उभे राहिले आहे.