विद्येचं माहेरघर म्हटलं जाणार पुणे शहर आता गुन्हेगारांचं माहेरघर झालंय का ? असा सवाल सर्वसामान्य पुणेकरांना पडलाय.
कारण गेल्या काही वर्षात पुण्यात घडणारे खून, खुनाचा प्रयत्न, लैंगिक अत्याचार असे गुन्हे पाहून पुण्यात पोलीस आहेत की नाही असा संशय यायला लागलाय.
कारण या आठवडाभरात पुणे शहरात सलग चार ते पाच खुनाच्या घटना आणि काही खुनाच्या प्रयत्नाच्या घटनाही घडल्या. त्यातही आज सकाळी टोळी युद्धातून बालाजी नगर परिसरात एक तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
संपूर्ण परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं. मात्र यामुळेच पुणे पोलीस नेमकं करतायत काय ? हा प्रश्न उपस्थित होतोय. त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट...
पुण्यातील हडपसरच्या काळेपडळ मध्ये मुलीच्या प्रियकराने आईच्या प्रियकराचा निर्घृण खून केला.
त्यानंतर कोथरूड येथील गोपीनाथ नगर परिसरात साहिल कांबळे नावाच्या तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. त्यानंतर वडगाव बुद्रुक परिसरात रुपेश भादिर्गे नावाच्या सलून चालकाला जीवघेणा हल्ला करून संपवलं. या तीनही खुणांना पूर्वीची पार्श्वभूमी होती. मात्र या व्यतिरिक्त काशेवाडी भागातील एका महिलेनं दारू पिऊन त्रास देणाऱ्या वडिलांना कंटाळून त्यांचीच हत्या केली. असे एकूण 4 खून करण्यात आले. तर काही खुनाचे प्रयत्नही झाले. ज्यामध्ये दत्तनगर चौकात एका रिक्षा चालकावर तिघांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. व त्याला पुलावरून खाली फेकून दिलं.
त्यानंतर आज सकाळी आंदेकर टोळीनं अक्षय म्हस्के याच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार केले. तसा या आरोपींचा उद्देश हा अक्षयला ठार करण्याचाच होता.
मात्र सुदैवाने तो यात बचावला व सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याव्यतिरिक्त शहरभरात अनेक मारामाऱ्या, खुनाचे प्रयत्न आणि इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे करण्यात आली आहे.
पण इतकं सगळं घडत असताना पुणे पोलीस आहेत तरी कुठे ? पुणे पोलीस कायम सगळा गुन्हा घडून गेल्यानंतरच येणार का ? मोठे गुन्हे घडण्याच्या आधी पोलिसांना खबऱ्यांच्या मार्फत काहीच माहिती मिळत नाही का ?
पोलिसांची इंटेलिजन्स टीम आणि गुप्त माहितीदार काय करतायेत ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सराईत गुन्हेगारांवरचा पोलिसांचा धाक कमी झालाय आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलीस आपलं रक्षण करतील ही भावनाही कमी होत चालली आहे.
विशेषतः टोळी युद्धातून होणारे गुन्हे हे सातत्याने वाढतायेत. या सगळ्यावर बारीक नजर ठेवणं, गुन्हा घडण्याआधीच अलर्ट असणं आणि सराईत गुंडांचे कट उधळून लावणं हे पोलिसांचं काम आहे. पण गेल्या काही दिवसात तसं घडताना दिसत नाहीत.
गुन्हा घडल्याच्या नंतर पोलीस घटनास्थळावर पोहोचतात मात्र गुन्हा घडण्यापूर्वी सावधगिरी बाळगणं किंवा गुन्हा घडण्यापासून थांबवणं यामध्ये पोलीस सपशेल अपयशी ठरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अनेक गुन्हे हे पोलीस स्टेशन पासून अगदी जवळच घडतात.
ज्यामुळे गुन्हेगारच आता पोलिसांना "गांभीर्यानं" घेत नसल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पुण्यात खाकीचा खुळखुळा झालाय का ?
आणि नव्याने नियुक्त झाल्यानंतर सगळ्या कुख्यात गुंडांची परेड काढणारे पोलीस आयुक्त आणि त्यांचे सहकारी इतकं सगळं घडत असताना ॲक्शन मोडवर कधी येणार ?
हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय. यावरच पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी पोलिसांची बाजू मांडली आहे.