धक्कादायक आकडेवारी : लग्न जुळत नसल्याने 6 महिन्यात 29 तरुणांच्या आत्महत्या, जळगावात कौस्तुभने संपवली जीवनयात्रा - टॉप न्यूज मराठी

जळगाव : सरकारी नोकरी आणि स्वतःचे घर नसल्याने विवाहासाठी नकार मिळाल्याने जळगावच्या पिंपराळा परिसरातील कौस्तुभ पोद्दार या 26 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बी.फार्मसी शिक्षित असलेल्या कौस्तुभला नाशिकमध्ये खाजगी नोकरी होती. आईच्या निधनानंतर विवाहासाठी आलेल्या 3-4 स्थळांनी "सरकारी नोकरी नाही, घर नाही आणि वयस्कर वडील सोबत राहणार" या कारणाने नकार दिला. यातून नैराश्यात गेलेल्या कौस्तुभने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली.

ही एकमेव घटना नाही. जळगाव पोलिसांच्या आकडेवारीनुसार 1 जानेवारी ते 30 जून या 6 महिन्यांत जिल्ह्यात 29 तरुणांनी लग्न जुळत नसल्याने आत्महत्या केल्या आहेत. याच कालावधीत 400 हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. त्यात 383 पुरुष आणि 29 महिलांचा समावेश आहे.

पोलिसांनुसार आत्महत्येची इतर कारणे म्हणजे दारूचे व्यसन, नैराश्य, कौटुंबिक वाद आणि कर्जबाजारीपणा आहेत. मात्र वाढत्या अपेक्षांमुळे अनेक तरुणांचे लग्न रखडले आहेत. मुलींना आता सरकारी नोकरी, चांगला पगार, स्वतःचे घर आणि सासू-सासरे नको असतात.

"सुशिक्षित आणि समजदार मुलाला पसंती द्या, म्हणजे पुन्हा कोणत्या कौस्तुभवर अशी वेळ येणार नाही" अशी भावना कौस्तुभच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.