मुंबई : मुंबई पोलीस दलातूनच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरांना पकडण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्याच पोलीस दलात वेतन घोटाळा झाल्याचे उघड झाले असून आता विभागामध्येच कारवाईचे सत्र सुरू झाले आहे. समतानगर पोलीस ठाण्याच्या वेतन आणि प्रशासकीय विभागात झालेल्या या गैरप्रकारामुळे शासनाच्या खजिन्याला तब्बल 6 कोटी 41 लाख रुपयांचा फटका बसल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे. समतानगर पोलीस ठाण्यातील तत्कालीन प्रमुख लिपिक विजया चव्हाण आणि तत्कालीन वरिष्ठ लिपिक अमोल मेश्राम या दोघांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सहपोलीस आयुक्त प्रशासन यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघेही निलंबित राहणार असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे. यापूर्वीच या दोघांसह इतर काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार 2019 च्या डिसेंबर महिन्यात आणि त्यानंतर 2020 च्या जानेवारी, फेब्रुवारी तसेच जून ते सप्टेंबर या कालावधीतील वेतनात मोठ्या प्रमाणावर घोटाळा करण्यात आला. वेतन आणि प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगनमताने हा अपहार केला असा संशय आहे. पोलीस दलात नसलेल्या व्यक्तींनाही पोलीस कर्मचारी असल्याचे दाखवून त्यांच्या नावे खोटी वेतन देयके तयार करण्यात आली. बनावट कागदपत्रे सादर करून शासकीय निधीचा गैरवापर करण्यात आला. यामध्ये तत्कालीन प्रशासकीय अधिकारी रामकिशन गोस्वामी, नागेश तळवडेकर, प्रमुख लिपिक अजय राठोड यांचाही समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे, पुरावे नष्ट करणे आणि कट रचणे अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांखाली भारतीय दंड संहितेच्या कलम 409, 420, 406, 467, 465, 471, 201, 120 ब आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेतन खात्याची तपासणी करताना 2019 ते 2020 या वर्षातील नोंदींमध्ये मोठी तफावत आढळून आली. त्यानंतरच हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
पोलीस दलाची प्रतिमा डागाळणाऱ्या या घटनेमुळे विभागात खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून आता इतर पोलीस ठाण्यांमध्येही अशा प्रकारची तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.