पूजेच्या वेळी आपण कापूर वापरतो. कापूर जाळल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि वास्तुदोष कमी होतो असे मानले जाते. म्हणून कापूर पवित्र मानला जातो. पण तुम्हाला माहित आहे का पूजेव्यतिरिक्त कापूर आपल्या आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदात कापराला खूप महत्व दिले आहे. कापरामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि औषधी गुणधर्म असतात जे शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवतात. चला तर मग कापरापासून कोणते फायदे मिळतात ते सविस्तर जाणून घेऊ.
तणाव दूर करण्यासाठी -
आजकाल कामाच्या तणावामुळे सगळेच त्रस्त आहेत. कापराचा सुगंध मनाला शांत करतो. जर तुम्हाला जास्त ताण येत असेल किंवा झोप येत नसेल तर हा उपाय करा. एका छोट्या भांड्यात कापराची एक वडी ठेवा आणि ते भांडे बेडरूममध्ये ठेवा. त्याचा सुगंध संपूर्ण खोलीत पसरेल. यामुळे मन शांत होईल आणि तणाव दूर होईल. रात्री शांत झोप लागण्यासाठी पण हा उपाय खूप चांगला आहे.
डोकेदुखी दूर करण्यासाठी -
सतत डोकेदुखीचा त्रास असेल तर कापूर गुणकारी आहे. यासाठी कापूर, सुंठ पावडर, अर्जुन झाडाची साल आणि पांढरे चंदन हे सगळे समप्रमाणात घेऊन बारीक वाटून घ्या. त्याची पेस्ट बनवून कपाळावर लावा आणि थोडा वेळ शांत पडून राहा. या नैसर्गिक उपायाने काही वेळातच डोकेदुखीपासून आराम मिळतो.
स्नायू दुखणे आणि खोकल्यासाठी -
थंडीच्या दिवसात स्नायू दुखणे किंवा पाठ दुखीचा त्रास खूप जणांना होतो. यासाठी मोहरीच्या तेलात थोडी कापूरची पूड टाकून गरम करा. या तेलाने नियमित शरीराची मालिश करा. यामुळे स्नायूंचा त्रास कमी होतो. जर खोकला किंवा सर्दी झाली असेल तर याच तेलाने छाती आणि पाठीला मालिश करा. आराम मिळेल. मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही तीळाचे तेल वापरले तरी चालेल. सर्दी झाली असेल तर गरम पाण्यात थोडी कापूर टाकून त्याची वाफ घेतली तरी सर्दी मोकळी होते.
त्वचेसाठी फायदेशीर -
चेहऱ्यावर डाग असतील तर कापूरचा उपयोग होतो. खोबरेल तेलात थोडी कापूर मिसळून ते तेल रोज रात्री त्वचेवर लावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग हळू हळू कमी होतात आणि त्वचा स्वच्छ होते. पण लक्षात ठेवा जर तुमची त्वचा खूप तेलकट असेल तर हा उपाय करण्याआधी एकदा त्वचा तज्ञाचा सल्ला घ्या.
केसांच्या समस्येसाठी -
केसात कोंडा होणे किंवा लहान वयात केस पांढरे होणे ही समस्या आजकाल सामान्य झाली आहे. खोबरेल तेलात कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाशी लावा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्याने कोंड्याची समस्या दूर होते आणि केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यास मदत होते.
भेगा पडलेल्या टाचांसाठी -
हिवाळ्यात टाचांना भेगा पडणे ही सगळ्यांचीच समस्या असते. यावर कापूर खूप प्रभावी आहे. एका बादलीत कोमट पाणी घ्या त्यात थोडी कापूरची पूड आणि थोडे तेल टाका. त्यात 15 मिनिटे पाय बुडवून ठेवा. नंतर पाय स्वच्छ पुसून घ्या आणि क्रीम किंवा खोबरेल तेल लावा. हा उपाय रोज 4 ते 5 दिवस केल्याने भेगा पूर्णपणे भरून येतील.
कापूर हा बाहेरून लावण्यासाठी आहे. तो खाऊ नये. लहान मुलांपासून कापूर दूर ठेवावा. जास्त प्रमाणात कापूर वापरू नये. कोणतीही गंभीर समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.