रंजक रोचक : हा पक्षी 6 महिने हवेतच राहतो, जमिनीवर कधीच उतरत नाही, झोपही उडतानाच घेतो - टॉप न्यूज मराठी

रंजक रोचक : आपण पाहतो की पक्षी दिवसा उडतात आणि रात्री झाडावर बसून विश्रांती घेतात, पण निसर्गात एक असा पक्षी आहे जो महिनोनमहिने हवेतच राहतो आणि जमिनीवर उतरतच नाही. त्याचे नाव आहे कॉमन स्विफ्ट. हा पक्षी दिसायला चिमणीसारखा छोटा असतो, त्याचा रंग काळपट तपकिरी असतो आणि त्याचे पंख लांब व टोकदार असतात. त्याचा वेग ताशी 110 किलोमीटरपर्यंत असतो.

शास्त्रज्ञांनी या पक्ष्यांच्या पायात छोटे सेन्सर लावून अभ्यास केला असता समोर आले की हा पक्षी स्थलांतराच्या काळात सलग 6 ते 10 महिने हवेतच राहतो. तो हवेतच खातो, पितो आणि झोपतो सुद्धा. हा पक्षी हवेत उडणाऱ्या छोट्या किड्यांवर जगतो, उडता उडता तोंड उघडून किडे पकडतो आणि पावसाचे पाणी हवेतच पितो. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे तो उडता उडता झोप घेतो. शास्त्रज्ञांच्या मते तो आकाशात खूप उंच जाऊन हळू हळू घिरट्या घालत झोपतो, त्याच्या मेंदूचा अर्धा भाग झोपतो आणि अर्धा भाग जागा राहून उडण्यावर नियंत्रण ठेवतो.

या पक्ष्याचे पाय खूप छोटे आणि कमकुवत असतात, त्यामुळे तो जमिनीवर चालू शकत नाही आणि झाडाच्या फांदीवरही नीट बसू शकत नाही. तो फक्त कड्यांच्या भिंती किंवा उंच इमारतींना चिकटू शकतो, त्यामुळेच तो आपले संपूर्ण आयुष्य हवेत घालवतो. हा पक्षी आयुष्यात फक्त तेव्हाच खाली येतो जेव्हा त्याला अंडी द्यायची असतात. अंडी उबवल्यानंतर पुन्हा तो आकाशात निघून जातो. हा पक्षी युरोप आणि आशियात आढळतो आणि हिवाळ्यात आफ्रिकेत स्थलांतर करतो, याच स्थलांतरादरम्यान तो महिनोनमहिने हवेत राहतो. निसर्गाची ही कमाल पाहून शास्त्रज्ञही थक्क झाले आहेत.