पुणे : तुम्ही कधी पाहिलं आहे का ? एखाद्या कॅफेमध्ये एक कपल बसलेलं असतं, समोर पिझ्झा आहे, पण दोघांचेही लक्ष मोबाईलमध्ये. कोणी रील स्क्रोल करतंय, तर कोणी ऑफिसच्या मेलमध्ये बिझी. बोलणं शून्य. अशीच परिस्थिती आज अनेक घरांमध्ये आहे. एकाच बेडवर दोघे झोपलेत, पण दोघांच्या हातात वेगवेगळे फोन. यामुळेच हल्ली नात्यात दुरावा वाढत चालला आहे आणि यावर उपाय म्हणून आता कपल्समध्ये एक नवा नियम ट्रेंड होतोय - 'नो फोन डिनर' किंवा 'सायलेंट 6 PM'.
हा नियम खूप सोपा आहे. संध्याकाळी 6 किंवा 7 वाजल्यानंतर दोघांनीही आपला फोन सायलेंट, स्विच ऑफ किंवा दुसऱ्या रूममध्ये ठेवायचा. रात्रीचे जेवण होईपर्यंत, किंवा झोपेपर्यंत अजिबात फोनला हात लावायचा नाही. या वेळात फक्त एकमेकांशी गप्पा, दिवसभरात काय झालं ते शेअर करणे, एकत्र जेवण बनवणे किंवा फक्त शांत बसणे.
मानसशास्त्रज्ञांच्या मते, याला 'फबिंग' (Phubbing) म्हणतात. म्हणजे Phone + Snubbing. समोरच्या व्यक्तीला इग्नोर करून फोनमध्ये गुंतून राहणे. सतत नोटिफिकेशन, इंस्टाग्राम रील्स आणि व्हॉट्सअॅपमुळे आपण समोरच्या व्यक्तीला ऐकतच नाही. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणे, एकटेपणा आणि नात्यात कंटाळा येऊ लागतो. पुण्यातील अनेक आयटी कपल्सनी हा अनुभव घेतल्यानंतर हा उपाय शोधला आहे.
जे कपल्स हा नियम फॉलो करतात, त्यांचे नातं जास्त घट्ट झाल्याचे सांगतात. जेव्हा फोन नसतो, तेव्हा खरा संवाद सुरू होतो. एकमेकांकडे लक्ष जाते. भांडणे कमी होतात. झोपही चांगली लागते, कारण झोपण्यापूर्वी स्क्रीनचा निळा प्रकाश डोळ्यांना आणि मेंदूला त्रास देतो.
तुम्हीही ट्राय करून पाहा. आज संध्याकाळी 6 नंतर फक्त 2 तास फोन बाजूला ठेवा आणि जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा मारा. कदाचित तुमच्या नात्यातील हरवलेला संवाद पुन्हा सापडेल. कारण मोबाईलमध्ये नेटवर्क मिळेल, पण नात्यात नेटवर्क टिकवण्यासाठी वेळ द्यावा लागतो.