शेतकऱ्यांसाठी शेतीत आता नवीन क्रांती आली आहे - ती म्हणजे ड्रोन फवारणी. एकेकाळी 10 मजूर 2 दिवसात जे काम करायचे, तेच काम आता ड्रोन 1 तासात करतो. मजुरांची टंचाई, औषधाचा खर्च आणि वेळेची बचत यासाठी सरकारने SMAM - कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत ड्रोन खरेदीवर मोठे अनुदान जाहीर केले आहे.
केंद्र सरकारच्या नियमानुसार 3 प्रकारात अनुदान मिळते.
1. वैयक्तिक शेतकऱ्यासाठी: अल्पभूधारक, महिला, SC/ST शेतकऱ्याला ड्रोनच्या किमतीच्या 50% पर्यंत म्हणजे जास्तीत जास्त 5 लाख रुपये अनुदान. इतर शेतकऱ्यांना 40% म्हणजे 4 लाखांपर्यंत.
2. FPO / सहकारी संस्थेला: शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) ने ड्रोन घेतला तर 75% पर्यंत अनुदान मिळते.
3. कृषी पदवीधर तरुणासाठी जर तुम्ही कृषी पदवीधर असाल आणि भाडेतत्वावर ड्रोन सेवा देण्यासाठी कस्टम हायरिंग सेंटर (CHC) काढत असाल तर तुम्हाला 50% म्हणजे 5 लाखांपर्यंत अनुदान मिळेल. सध्या एका ड्रोनची किंमत 8 ते 10 लाख आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. तुम्हाला Mahadbt Portal - http://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. तिथे शेतकरी योजना कृषी यांत्रिकीकरण ड्रोन हा पर्याय निवडा.
लागणारी कागदपत्रे: 7/12, 8अ, आधार कार्ड, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र (SC/ST साठी), आणि ड्रोनचे कोटेशन. अर्ज केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी तुमच्या अर्जाची छाननी करतील. पूर्वसंमती मिळाल्यानंतरच ड्रोन खरेदी करायचा आहे, आधी खरेदी केल्यास अनुदान मिळणार नाही.