नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने डीलिमिटेशनच्या माध्यमातून महिला आरक्षण देणाऱ्या संविधान दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत सर्व राज्यातील लोकसभेच्या जागांची संख्या 50 टक्क्यांनी वाढणार आहे. ही व्यवस्था 2051 पर्यंत लागू राहणार आहे.
आता हे विधेयक नेमके काय आहे, ते सोप्या भाषेत समजून घेऊया. डीलिमिटेशन म्हणजे मतदारसंघांच्या सीमा पुन्हा ठरवणे. यातून लोकसभेच्या जागा वाढतील आणि त्यातून महिलांना आरक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीचे गणित बदलणार आहे.
केंद्र सरकारने येत्या 30 नोव्हेंबर रोजी लोकसभेचं अधिवेशन बोलावलं आहे. आधी हे विधेयक लोकसभेत सादर केले जाईल, अशी चर्चा होती. पण कॅबिनेटच्या बैठकीतच त्यावर शिक्कामोर्तब झाल्याने या विधेयकासाठीच अधिवेशन बोलावल्याचे स्पष्ट झाले आहे.
एप्रिलमध्ये सरकारने हे विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला होता. पण दोन तृतीयांश बहुमत नसल्याने ते मंजूर होऊ शकले नाही. मात्र आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात आले आहेत. टीएमसीच्या खासदारांनी बंड केले आहे. डीएमके इंडिया आघाडीतून बाहेर पडली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिकाही काठावरची आहे. त्यामुळे हे विधेयक यावेळी मंजूर होईल, अशी सरकारला आशा आहे.
विरोधकांची भूमिका अजून स्पष्ट नाही. समाजवादी पार्टीने या विधेयकाला विरोध केला आहे. तर डीएमके आणि बीआरएसने काही अटींवर पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसने हे विधेयक म्हणजे संविधानावर आघात असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, इंडिया ब्लॉकने शनिवारी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत परिसीमन विधेयकाला पाठिंबा न देण्याबाबत रणनीती ठरवली जाणार आहे. ही बैठक सकाळी 11.30 वाजता होणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्रतिनिधी बैठकीला येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.