कृषी : शेणापासून बनवा सोनं, गांडूळ खताच्या व्यवसायातून महिन्याला 50 हजार कमाई कशी करायची - टॉप न्यूज मराठी

कृषी : शेतीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर फक्त पीक पिकवून चालणार नाही, जोडधंदा करणे गरजेचे आहे. त्यातला सगळ्यात कमी खर्चात सुरू होणारा आणि जास्त नफा देणारा व्यवसाय म्हणजे गांडूळ खत निर्मिती. शेण जे आपण वाया जाते असं समजतो त्याच शेणापासून तुम्ही महिन्याला 40 ते 50 हजार रुपये सहज कमवू शकता. कसे ते सविस्तर पाहूया.

गांडूळ खत म्हणजे काय आणि मागणी का वाढली आहे

गांडूळ खत म्हणजे गांडुळांनी शेण आणि पालापाचोळा खाऊन तयार केलेले सेंद्रिय खत. रासायनिक खतामुळे जमीन खराब होत असल्याने आता सगळे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. सरकार सुद्धा सेंद्रिय शेतीला अनुदान देत आहे. त्यामुळे गांडूळ खताला बाजारात प्रचंड मागणी आहे. एक किलो गांडूळ खताचा दर आज 10 ते 15 रुपये आहे आणि नर्सरीमध्ये तोच दर 20 ते 25 रुपयापर्यंत जातो.

व्यवसाय सुरू करण्यासाठी काय लागेल

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या जागेची गरज नाही. तुमच्या घरामागे किंवा शेतात 10 बाय 30 फुटाची सावलीची जागा असेल तरी खूप झाली. सुरुवातीला तुम्हाला फक्त 3 गोष्टी लागतील.

एक म्हणजे शेण, दोन म्हणजे गांडूळ आणि तीन म्हणजे थोडा ओला कचरा, पालापाचोळा.

गांडुळासाठी आयसेनिया फेटीडा ही जात सगळ्यात चांगली मानली जाते. हे गांडूळ तुम्हाला कृषी विद्यापीठात किंवा जवळच्या गांडूळ खत प्रकल्पात 300 ते 400 रुपये किलोने मिळतील. सुरुवातीला 10 किलो गांडूळ पुरेसे आहेत.

खत कसे तयार करायचे, सोपी पद्धत

पहिल्यांदा सावलीत एक बेड तयार करा. बेड म्हणजे विटांनी बनवलेला छोटा हौद, उंची साधारण दीड फूट.

त्यात सगळ्यात खाली विटांचे तुकडे, त्यावर वाळू, त्यावर शेण आणि पालापाचोळा मिक्स करून टाका.

हे मिश्रण 15 दिवस पाण्याने ओले करत ठेवा म्हणजे त्यातील गरमी निघून जाईल.

15 दिवसानंतर त्यात गांडूळ सोडा आणि वरून गोणपाट झाका.

दररोज थोडे पाणी शिंपडा, 45 ते 60 दिवसात वरचा सगळा भाग काळ्या चहा पावडर सारखा दिसायला लागेल. तेच तुमचे तयार गांडूळ खत.

तयार झालेले खत चाळून घ्या आणि गांडूळ परत दुसऱ्या बेडमध्ये टाका.

खर्च आणि कमाईचे गणित

  • समजा तुम्ही 3 बेडपासून सुरुवात केली.
  • गांडूळ 10 किलो - 3500 रुपये
  • बेड बांधणी आणि शेड - 5000 ते 7000 रुपये एकदाच
  • शेण आणि मजुरी - सुरुवातीला घरचेच असेल तर खर्च नाही.
  • एक बेडमधून 60 दिवसात सुमारे 500 ते 600 किलो खत मिळते. 3 बेडमधून 1500 किलो.
  • 1500 किलो गुणिले 12 रुपये = 18,000 रुपये. हे फक्त 2 महिन्याचे आहे.
  • एकदा गांडूळ वाढले की त्यांची संख्या दुप्पट होते. तेच गांडूळ तुम्ही 400 रुपये किलोने विकू शकता.
  • जर तुम्ही 10 ते 12 बेड केले तर महिन्याला 4000 ते 5000 किलो खत सहज निघते. त्यातून 45 ते 60 हजार रुपये कमाई होते.

खत कुठे विकायचे

विक्रीसाठी अजिबात टेन्शन नाही. जवळच्या नर्सरी, कृषी सेवा केंद्र, सेंद्रिय शेती करणारे शेतकरी, आणि आता तर अमेझॉन फ्लिपकार्टवर सुद्धा गांडूळ खत विकले जाते. तुम्ही 5 किलो, 10 किलोच्या बॅगमध्ये पॅकिंग केले तर जास्त दर मिळतो. जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातून तुम्हाला या व्यवसायासाठी अनुदान सुद्धा मिळू शकते.

एक महत्त्वाची टीप

  • बेडवर थेट ऊन येऊ देऊ नका, गांडूळ मरतात. आणि शेण ताजे वापरू नका, 10 ते 15 दिवस जुने शेण वापरा.
  • शेतीसोबत तुम्हाला जर खात्रीचा जोडधंदा हवा असेल तर गांडूळ खतापेक्षा चांगला पर्याय नाही. कमी खर्च, कमी मेहनत आणि कायमस्वरूपी मागणी.

डिस्क्लेमर - हा लेख माहितीसाठी आहे. कमाई ही तुमची जागा, मेहनत आणि बाजारपेठेवर अवलंबून असते. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी जवळच्या कृषी केंद्राचा सल्ला घ्या.