पुणे पोलिसांचा स्तुत्य उपक्रम ! 50 विधी संघर्षग्रस्त बालकांना सिंहगडावर मार्गदर्शन, व्यसनमुक्तीचा दिला संदेश - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुणे पोलिसांनी गुन्हेगारीकडे वळलेल्या अल्पवयीन मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक संवेदनशील आणि मानवतावादी उपक्रम राबवला आहे. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने 50 विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी विशेष दुर्गभ्रमण आणि समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश केवळ कायद्याची अंमलबजावणी करणे नसून, बालकांचे सुधारणा, पुनर्वसन आणि सकारात्मक व्यक्तिमत्व विकास घडवणे हा आहे.

हा उपक्रम पुणे शहर पोलीस उपायुक्त परि-3 आणि सहायक पोलीस आयुक्त सिंहगड विभाग विजयकुमार पळसुले यांच्या देखरेखीखाली राबवण्यात आला. बालकांना ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर नेण्यात आले. तिथे त्यांना गुन्हेगारीचा मार्ग सोडून सन्मानाने आणि जबाबदारीने जीवन जगण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संवादात्मक सत्रामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी शिक्षणाचे महत्त्व, करिअरच्या संधी, कौटुंबिक मूल्ये आणि गुन्हेगारीमुळे भविष्यात होणारे दुष्परिणाम याविषयी सविस्तर चर्चा केली.

या प्रसंगी 'Say No to Drugs, Yes to Life' चा नारा देत बालकांना व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले आणि त्यापासून परावृत्त होण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. लवकरच अशा बालकांसाठी व्यसनमुक्ती मोहीम सुद्धा घेण्यात येणार आहे.

या उपक्रमात झोन-3 मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे पोलीस निरीक्षक, पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक (DB) आणि सरहद्दील पथकाचे अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला. पुणे पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून कौतुक होत आहे.