मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक पोलीस गाडीतील काही जणांना थेट, "पुन्हा दिसलास तर ५० ग्रॅमची पावडर टाकेन," अशी धमकी देताना दिसून येत आहे. या व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली असून, मुंबई पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "माझ्याकडे एक व्हिडिओ आला. मुलं टॅक्सी न चालली होती. पोलीस म्हणतात, '50 ग्रॅम पावडर टाकेन.' हा पोलीस ड्रग सप्लायर आहे का? पोलिसांकडे पावडर मिळायला लागली का? हे काय चाललंय ते कळतच नाही."
दरम्यान, या पत्रकार परिषदेनंतर गृह खात्याने तातडीने संबंधित पोलीस पवन सांगळे याचे निलंबन केले आहे. सायन पोलीस स्टेशनमध्ये तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. दरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांनीदेखील या व्हिडिओप्रकरणी पोलीस महासंचालकांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.