मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा ! घाटकोपरच्या साकीनाक्यात डोंगराचा भाग कोसळला, 5-6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती - टॉप न्यूज मराठी

मुंबई : गेल्या 24 तासांपासून मुंबईत पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. याच मुसळधार पावसामुळे बुधवारी मध्यरात्री घाटकोपर पश्चिमेतील साकीनाका भागातील गौसिया चाळ परिसरात मोठी दुर्घटना घडली. येथील डोंगराचा काही भाग थेट रहिवासी घरांवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

नेमके काय घडले ?

काल रात्री साडे अकरा ते बारा च्या सुमारास गौसिया चाळीतील दोन ते तीन घरांवर डोंगराची दरड कोसळली. पाऊस आणि मातीचा दाब वाढल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी अनेकजण घरात झोपलेले होते. त्यामुळे पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच काही मिनिटांतच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. लगेचच बचावकार्याला सुरुवात करण्यात आली.

अरुंद गल्लीमुळे बचावकार्यात अडथळे

घटनास्थळाची गल्ली अतिशय अरुंद आहे. त्यामुळे मोठी यंत्रसामग्री आत नेणे शक्य झाले नाही. एकावेळी फक्त एकच व्यक्ती जाऊ शकेल इतकीच जागा आहे. या अडचणीवर मात करत जवान आणि महापालिका कर्मचारी हाताने एक-एक दगड, वीट आणि मातीचा ढिगारा बाजूला करत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.

महापौरांनी केली घटनास्थळी पाहणी

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सकाळीच घटनास्थळी भेट दिली. त्यांनी बचावकार्याचा आढावा घेतला. ते म्हणाल्या, परिस्थिती अतिशय गंभीर आहे. काही नागरिक आत अडकले असण्याची शक्यता आहे. गल्ली अरुंद असल्याने कामाला वेळ लागत आहे. अग्निशमन दल आणि पालिकेचे कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. स्थानिकांनी बचावकार्याच्या गतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावर महापौरांनी प्रशासन शक्य तितक्या वेगाने काम करत असल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांमध्ये विकी यादव, वाजिद अली, आरिफ शेख, मन्नत, आबन शेख आणि सद्दाम शेख या नावांचा समावेश आहे. त्यांची नेमकी प्रकृती आणि त्यांना बाहेर काढण्यात यश आले आहे की नाही याबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

पावसामुळे मुंबईत सतर्कतेचा इशारा

हवामान विभागाने मुंबईत आजही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पावसामुळे जुन्या इमारती, संरक्षण भिंती, दरडी आणि झाडे कोसळण्याच्या घटना वाढू शकतात. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आणि धोकादायक ठिकाणी न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. घाटकोपरच्या या दुर्घटनेतील अडकलेल्या सर्वांना लवकरात लवकर सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील काही तास महत्वाचे ठरणार आहेत.