मतमोजणीला सुरुवात! विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी, दुसऱ्या पसंतीच्या मतांवर निकालाचे भवितव्य - टॉप न्यूज मराठी

महाराष्ट्र : विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक अशा पाच मतदारसंघांसाठी शुक्रवारी मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल आज लागणार असून सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत एकूण 182 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक या पाच जागांसाठी ही निवडणूक झाली. मतदानाची टक्केवारी चांगली राहिली आहे. नागपूर पदवीधरमध्ये 64.76 टक्के, अमरावती शिक्षकमध्ये 91.08 टक्के विक्रमी मतदान झाले. पुणे पदवीधरमध्ये 62.78 टक्के तर पुणे शिक्षकमध्ये 85.87 टक्के मतदान झाले. तर मराठवाडा पदवीधरमध्ये 58.67 टक्के मतदानाची नोंद झाली.

मतमोजणीसाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. पदवीधरसाठी 100 टेबल तर शिक्षक मतदारसंघासाठी 42 टेबल लावण्यात आले आहेत. पुण्यातील मतमोजणी म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होत आहे. तर नागपूरची मोजणी मानकापूर क्रीडा संकुलात आणि अमरावतीची लोकशाही भवनात होत आहे.

या निवडणुकीत पुणे पदवीधरमध्ये भाजपच्या स्मिता जाधव विरुद्ध शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख अशी थेट लढत आहे. तर नागपूरमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे विरुद्ध काँग्रेसचे अभिजीत वंजारी अशी चुरस आहे. पहिल्या पसंतीचा 15 ते 16 हजार मतांचा कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागणार असल्याने निकालाला उशीर होण्याची शक्यता आहे.