पैसा येतो पण टिकत नाही का ? लक्ष्मी चंचल नाही तर या 5 चुका कारणीभूत आहेत, अध्यात्मात सांगितलेले नियम एकदा वाचा - टॉप न्यूज मराठी

वास्तुशास्त्र : अनेक जण म्हणतात खूप कष्ट करतो, पैसा येतो पण महिन्याच्या शेवटी हातात काहीच राहत नाही. कोणी म्हणते लक्ष्मी चंचल आहे. पण अध्यात्मात असे सांगितले आहे की लक्ष्मी चंचल नाही, आपल्या सवयी चंचल आहेत. पैसा ही सुद्धा एक ऊर्जा आहे आणि ती जशी येते तशीच तिला जपावे लागते. पैसा टिकवण्यासाठी फक्त कमवणे महत्त्वाचे नाही तर त्याच्याशी वागणेही महत्त्वाचे आहे.

पैसा का टिकत नाही याची खरी कारणे -

1. पैशाबद्दल मनात नकारात्मक विचार असणे - सतत पैसा नाही, गरीबी आहे असे बोलणे.

2. आल्या पैशाचा हिशोब न ठेवणे - कुठे गेला कळतच नाही.

3. दुसऱ्याच्या पैशाचा हेवा करणे - त्याच्याकडे आहे माझ्याकडे नाही ही भावना.

4. गरज नसताना खर्च करणे - फक्त दाखवण्यासाठी खरेदी करणे.

अध्यात्म पैशाला स्थिर करण्यासाठी 5 नियम सांगते -

नियम 1 - पैशाला आदर द्या -

अध्यात्मात पैशाला लक्ष्मी मानले आहे. लक्ष्मी म्हणजे फक्त नोटा नाहीत तर समृद्धीची भावना. पाकीट फाटले, पैसे कोंबून ठेवणे, जमिनीवर पडलेले पैसे दुर्लक्ष करणे या गोष्टी टाळा. पाकीट नेहमी स्वच्छ ठेवा, पैसे व्यवस्थित ठेवा. जेव्हा आपण पैशाला आदर देतो तेव्हा खर्च करताना विचार करतो.

नियम 2 - मिळालेल्या पैशातून थोडा भाग बाजूला काढा -

पूर्वीच्या काळी कमाईचे चार भाग करण्याची पद्धत होती. एक भाग दानधर्म, एक भाग बचत, एक भाग गुंतवणूक आणि एक भाग खर्च. आज आपण सगळा पैसा खर्चात घालवतो. पगार आला की आधी 10 टक्के तरी बाजूला काढा. ते लगेच खर्च करू नका. हा पैसा अडचणीत आधार देतो. याला अध्यात्मात भविष्यासाठी लक्ष्मीला बांधून ठेवणे असे म्हणतात.

नियम 3 - कृतज्ञता आणि दान -

जेव्हा पैसा येतो तेव्हा आपण तक्रार करतो की कमी आला. पण जो पैसा आला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर मनात समाधान राहते. महिन्यातून एकदा तरी आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, गरजूला मदत किंवा मंदिरात काही सेवा करा. दान म्हणजे पैसा कमी होणे नाही तर पैशाचा प्रवाह सुरू ठेवणे आहे. जिथे प्रवाह असतो तिथे पैसा अडकत नाही.

नियम 4 - बोलण्यात लक्ष्मीचा अपमान टाळा -

रोजच्या बोलण्यात पैसा वाईट आहे, पैशामुळे भांडण होतात, पैसा हातचा मळ आहे असे वारंवार बोलू नका. ज्या गोष्टीला आपण वाईट म्हणतो ती आपल्याकडे टिकत नाही. पैसा चांगल्या कामासाठी उपयोगी आहे, तो आला तर चांगले शिक्षण, चांगले आरोग्य आणि कुटुंबाला सुख देता येते असा विचार ठेवा. सकारात्मक विचार पैशाला आकर्षित करतो.

नियम 5 - घरात स्वच्छता आणि शिस्त -

ज्या घरात अडगळ, धूळ आणि अस्वच्छता असते तिथे लक्ष्मी स्थिर राहत नाही असे अध्यात्मात सांगितले आहे. याचा अर्थ असा की जिथे आळस आहे तिथे समृद्धी नाही. स्वयंपाकघर, तिजोरीची जागा आणि मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा. हिशोबाची वही किंवा खर्चाची नोंद ठेवण्याची शिस्त लावा. शिस्त जिथे असते तिथे पैसा आपोआप वाढतो.

एक छोटा उपाय रोज करा -

रोज सकाळी किंवा संध्याकाळी 2 मिनिटे डोळे बंद करून आज दिवसभर पैसा कसा आला आणि कुठे गेला याचा विचार करा. अनावश्यक खर्च कोणता झाला हे आठवा. दुसऱ्या दिवशी तो टाळण्याचा प्रयत्न करा. हा उपाय केल्याने एका महिन्यातच खर्चावर नियंत्रण येईल.

पैसा टिकवणे म्हणजे कंजूषपणा नाही. पैसा आनंदासाठी आहे पण तो आनंद रोज मिळावा यासाठी त्याचे नियोजन हवे. कष्टासोबत जर या सवयी लावल्या तर पैसा येईलही आणि टिकेलही.

डिस्क्लेमर - हा लेख अध्यात्मिक आणि सामान्य जीवनशैलीच्या माहितीवर आधारित आहे. हा कोणताही आर्थिक सल्ला नाही. गुंतवणुकीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.